बार्शी : शहरातील श्रीराम मंदिरात मर्यादापुरुषोत्तम अयोध्यापती प्रभू श्रीरामचंद्राचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने येथील श्री रामनवमी मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावरून जय श्रीराम… जय… जय… श्रीरामच्या नामघोषात, सायंकाळी भव्य शोभायात्रा काढली. यामुळे बार्शी शहरात भगवेमय वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.
पौराणिक कथेनुसार श्रीरामनवमीच्या दिनी त्रेतायुगात महाराज दशरथांच्या घरी विष्णूचा अवतार असलेल्या मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म झाला होता. रावणाचा अंत करण्यासाठी रामाचा जन्म झाला, त्यामुळे आजही सुशासन, मर्यादा, सदाचारी म्हणून प्रभू श्रीरामचंद्राला पूजले जाते. त्याच पार्श्वभूमीवर बार्शी शहरात मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीराम जन्मोत्सव सोहळा थाटात साजरा करण्यात आला.
मध्यवर्ती उत्सव समितीने शहरातील मुख्य रस्त्यावरून जय श्रीराम.. जय… जय… श्रीराम… प्रभू श्री रामचंद्र की जय.. सियावर रामचंद्र की जय.. जय श्रीराम नावाचा जयघोष करीत भव्य शोभायात्रा काढली. या वेळी हातात भगवे झेंडे घेऊन तसेच डोक्यावर भगवी टोपी परिधान केलेले शेकडो युवक व महिला मोठ्या संख्येने घोषणा देत शोभायात्रेत सहभागी झाले. भगवंत देवस्थानचे अध्यक्ष दादा बुडूख, उत्तरेश्वर देवस्थानचे पुजारी महेश गुरव राममंदिरांचे पुजारी कुलकर्णी महेश व यांच्या हस्ते मूर्तीची व अश्वपूजा करण्यात आली.
या वेळी प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांच्या वेशभूषा परिधान केलेली लहान मुले सर्वांचे लक्ष्य वेधून घेत होती.शहरातील भगवंत मंदिर मार्गावरील श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सव सोहळा मोठ्या आनंदाने पार पडला. दुपारी १२ वाजता प्रभू श्रीरामाचा जन्म झाला. यावेळी आरती, पूजा करून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. उत्सवादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बांधवांनी चौकाचौकांत पोलिस बंदोबस्त लावून शांततेत रामनवमी उत्सव साजरी करण्यासाठी परिश्रम घेतले.