नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन जीएसटीच्या दरात बदल करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर काही दिवसातच जीएसटीच्या दरात मोठे बदल करण्यात आले आणि अनेक वस्तूंवरील कर कमी करण्यात आला. त्यामुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक गोष्टींवरील कर शून्यावर आल्यामुळे नागरिकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.
दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही या करसवलतीमुळे महिलांना मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप आणि भाजपशासित राज्यांमध्ये देशभरात अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीचे कार्यक्रम घेण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही दिल्लीत सेवा पंधरवडा अंतर्गत १६०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणी समारंभातही भाग घेतला.
या दरम्यान, त्यांनी दिल्लीतील महिलांना दिवाळी आणि नवरात्रीत मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याचे आवाहन केले. दिल्लीकरांनो, दिवाळी आणि नवरात्र लवकरच येत आहेत. आता, तुम्ही जे काही वापरता त्यावर २८ टक्के आणि १८ टक्के ऐवजी शून्य आणि ५ टक्के जीएसटी लागेल. मी दिल्लीतील माता आणि भगिनींना सांगू इच्छितो की २२ सप्टेंबरपासून घरी दादागिरी करा आणि शक्य तितके खरेदी करा. मुक्तपणे खरेदी करा, पण फक्त भारतात बनवलेले पदार्थ खरेदी करा, बाहेरचे नाही. आता भारतातील प्रत्येक नागरिकाने त्यांच्या देशात बनवलेले पदार्थ खरेदी करण्याची शपथ घेण्याची वेळ आली आहे.
स्वदेशीचा प्रचार करणे हा आपला स्वभाव बनला पाहिजे. तरच समृद्ध भारताचा संकल्प पूर्ण होईल असे अमित शाह म्हणाले. यावेळी अमित शाह यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी राम मंदिराच्या मुद्यावर खिल्ली उडवल्याबद्दल टीका केली. देशाच्या सीमा सुरक्षित करणे असो, सर्जिकल स्ट्राईक असो हवाई हल्ले असो किंवा ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानला योग्य उत्तर देणे असो, पंतप्रधान मोदींनी हे सर्व केले आहे. वर्षानुवर्षे आपल्या सर्वांना अयोध्येत राम मंदिर बांधायचे होते. राहुल गांधी भाजपची खिल्ली उडवत म्हणायचे आम्ही तिथे मंदिर बांधू, पण तारीख सांगणार नाही.
मंदिर बांधले गेले आहे, राम लल्ला सिंहासनावर विराजमान झाले आहेत आणि आज जगभरातील लोक त्याचा आनंद घेत आहेत. काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे बांधकाम असो किंवा सोन्याने सोमनाथ मंदिराचे पुनर्निर्माण सुरू करणे असो, पंतप्रधान मोदींनी वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला प्रत्येक मुद्दा क्षणार्धात सोडवला असेही अमित शाह म्हणाले.