नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नवी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए) च्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक घेतली असून ऑपरेशन सिंदूरवर बोलताना संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
या बैठकीत पंतप्रधान मोदींनी नेत्यांना कडक शब्दात सल्ला देताना नेत्यांना त्यांच्या भाषणात बोलण्यावर संयम ठेवण्यास आणि अनावश्यक आणि वादग्रस्त विधाने टाळण्याच्या सूचना केल्या. विशेषत: ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने करून भाजपची प्रतिमा मलिन करणा-या नेत्यांना पंतप्रधान मोदींचा सल्ला होता. बैठकीत सशस्त्र दलांच्या शौर्याचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाडसी नेतृत्वाचे कौतुक करणारा ठराव मंजूर करण्यात आला.
शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सादर केलेल्या प्रस्तावात ‘ऑपरेशन सिंदूूर’मुळे भारतीयांचा आत्मविश्वास वाढला आहे असे म्हटले आहे. या ठरावात मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक करण्यात आले आणि म्हटले की, त्यांनी नेहमीच सशस्त्र दलांना पाठिंबा दिला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ ने दहशतवाद्यांसह त्यांच्या प्रायोजकांना योग्य उत्तर दिले आहे. बैठकीत २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
पंतप्रधान मोदींचा रोख कुणाकडे : खरगे
अलिकडेच मध्य प्रदेश आणि हरियाणातील भाजप नेत्यांच्या वक्तव्यामुळे पक्षाची बदनामी झाली. हरियाणातील भाजप खासदार रामचंद्र जांगरा, विजय शाह आणि मध्य प्रदेशातील जगदीश देवडा यांनी या मुद्द्यावर निषेधार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणी पंतप्रधान मोदींनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. विरोधी पक्षाने म्हटले की, पंतप्रधान आणि भाजप नेतृत्वाचे मौन हे या विधानांना मूक मान्यता म्हणून पाहिले पाहिजे. पहलगाम पीडितांना आणि सशस्त्र दलांना बदनाम करण्यासाठी भाजप नेते एकमेकांशी स्पर्धा करत असल्याचा दावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.
काय म्हणाले मल्लिकार्जुन खरगे?
पहलगाममधील बळी आणि आपल्या शूर सैन्याला बदनाम करण्याची भाजप नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. भाजपचे राज्यसभा खासदार रामचंद्र जांगरा यांच्या लज्जास्पद विधानाने पुन्हा एकदा आरएसएस-भाजपची क्षुद्र मानसिकता उघडकीस आणली आहे. मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवदा यांनी आपल्या शूर सैन्याचा अपमान केला, परंतु मोदींनी कोणतीही कारवाई केली नाही. मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर अश्लील टिप्पणी केली, परंतु आजपर्यंत त्यांना काढून टाकले नाही. जेव्हा पहलगाममधील शहीद नौदल अधिका-याच्या पत्नीला सोशल मीडियावर ट्रोल केले जात होते, तेव्हाही मोदीजी गप्प होते. मोदीजी, तुम्ही म्हणता की तुमच्या नसांमध्ये सिंदूर आहे. जर तसे असेल तर महिलांच्या आदरासाठी तुम्ही तुमच्या या वाईट बोलणा-या नेत्यांना काढून टाकावे.