पंढरपूर – माझ्या मुलीचे लग्न तुझ्यामुळे मोडले असा खोटा आरोप करीत एका तरूणाला हात पाय बांधून लोखंडी गज आणि काठीने मारहाण केल्याची घटना पंढरपूर तालुक्यातील पेहे गावात घडली. इतकेच नाही तर त्याच्याकडून १० लाख रुपयांची मागणी देखील करण्यात आली.
गजराज पाटील असं मारहाण झालेल्या तरूणाचे नाव आहे. तुझ्यामुळे माझ्या मुलीचे जमलेले लग्न मोडले आहे. त्याला दहा लाख रूपये खर्च झाले आहेत. ते दहा लाख रूपये मला दे असे म्हणत संशयित आरोपी शेखर नामदेव बेलदार, संतोष नामदेव बेलदार यांच्यासह इतर लोकांनी लोखंडी गज आणि काठीने घरात कोंडून दोरीने हातपाय बांधून बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी आरोपी विरोधात करकंब पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.