पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपीला काल मध्यरात्री अटक केली. दरम्यान, आरोपीला १२ मार्चपर्यंत कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे. यानंतर आरोपीच्या वकिलांनी हा प्रकार पैशाच्या देवाण-घेवाणीवरून झाल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनीही या पद्धतीचा दावा केला आहे. ठोंबरे यांनी फेसबुकवर पोस्ट करून हा दावा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठा दावा केला आहे. या दाव्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. संमतीच्या संबंधात व्यवहाराचे पैसे दिले नाहीत म्हणून हा प्रकार घडल्याचा दावा रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुकवर याबाबत एक पोस्ट केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पुणे कोर्टात बस स्टँडमधील आरोपीला आणायच्या वेळी डीसीपी गिल साहेब यांनी माझीच चौकशी केली. मॅडम तुम्ही आंदोलन करणार असाल, आरोपीला काळे फासणार असाल तर प्लीज असे करू नका. त्याचवेळी साहेबांना सांगितले घटनेची खरी माहिती घेऊन त्याची प्राथमिक माहिती खरी असल्याची खात्री केल्याशिवाय मी बोलतही नाही आणि कोणतेच आंदोलन मी करणार नाही. तुम्हाला विश्वास नसेल तर तुमच्या सोबत थांबते. मला कोर्टात रिमांड रिपोर्ट पहायचा आहे. केसची माहिती घेणे, केसची स्टडी करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी लिहिले.
पण बस स्टँड घटनेत, पुणे नाहकच बदनाम झाले. एका संमतीच्या संबंधात व्यवहाराचे पैसे दिले नाहीत म्हणून याचा प्रचंड खेद वाटतो, असा दावा ठोंबरे यांनी केला. दुसरे बस स्टँड आगार व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार बाहेर आला. आता त्यांना सुटी नाही. नोकरीवर काम चोख करा नाहीतर घरी बसा कायमचे. तूर्तास एवढेच, असे या पोस्टमध्ये लिहिले आहे.