27.3 C
Latur
Wednesday, April 2, 2025
Homeपरभणीबियरबार संघटनेचा १ एप्रिलपासून बंदचा इशारा

बियरबार संघटनेचा १ एप्रिलपासून बंदचा इशारा

परभणी : राज्य सरकारने १ नोव्हेंबर २०२३ रोजी विक्रीकर ५ टक्यांवरून १० टक्के केल्याने बार व्यवसायाला मोठी खीळ बसली आहे. राज्य सरकारने परवान्यामध्ये वर्षभरात केवळ ८ दिवस कोरडे दिलेले आहेत. परंतू परभणी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलिसांच्या पत्राद्वारे जिल्ह्यात ४० ते ५० दिवस कोरडे दिवस पाळले जातात. याचा व्यवसायावर मोठा परीणाम होत आहे.

शेजारच्या जिल्ह्यात मात्र अशी अवस्था नसून गेल्या २५ वर्षांपासून परभणीकरांवर हा अन्याय होत आहे. तसेच या सर्वांमुळे व्यवसाय करणे कठीण झाले असून दि.१ एप्रिल पासून मागण्या मान्य होईपर्यंत बियरबार संघटना बंद पुकारणार असल्याचा इशारा परभणी जिल्हा बियरबार संघटनेने राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दरवर्षी परवाना नूतनीकरण शुल्कात १० टक्के वाढ होत असल्याने हे शुल्क ४ लाख ३० हजार पर्यंत पोहचले आहे. हे असेच सुरू राहील्यास येत्या ५ वर्षात हे शुल्क ८ ते ९ लक्ष पर्यंत होईल आणि ते कोणालाही परवडणारे नसल्याचे या निवेदनात म्हटले आहे. शहराची हद्द वाढ होणार नाही. परंतू शहराच्या बाजूला साधारण २ किलोमीटर अंतरवर ग्रामीण हद्द आहे. या ठिकाणी देखील व्यवसाय नुकसानीत असून बाजुबाजूला धाबे असून तिथे खुलेआम मद्य विक्री केल्या जात असल्याचा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे.

या सगळ्यामुळे व्यवसाय करणे कठीण झाले आहे. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील १४७ परवानाधारकांनी परवाना नुतनीकरण न करण्याबाबतचे शपथपत्र जोडून दिले आहे. तसेच ज्यांचा ५ वर्षासाठी नूतनीकरण परवाना आहे ते देखील या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. परभणी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनावर परभणी जिल्हा बियरबार संघटना उप जिल्हाध्यक्ष अरूण भिसे यांची स्वाक्षरी आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR