मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरली. सरसकट सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यात धडाधड पैसे आले. महायुती सरकार पुन्हा सत्तेत दाखल झाले. त्यानंतर या योजनेवरून गोंधळ सुरू झाला. या योजनेत निकषाचे, नियमाची रेषा आखण्यात आली. पाच लाख महिलांची नावे यादीतून कमी करण्यात आली. त्यावरून विरोधक संतापले आहेत. या बनवेगिरीविरोधात महायुतीच्या नेत्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.
विधानसभेवेळी तर निकषात न बसलेल्या पाच लाख महिलांच्या खात्यात सुद्धा रक्कम जमा करण्यात आली. आता अपात्र महिलांची छाननी करण्यात आली. त्यात लाभार्थ्यांची संख्या घटली. डिसेंबर २०२४ मध्ये २.४६ कोटी महिला पात्र होत्या. तो आकडा आता २.४१ कोटींवर आला. सरकारची मोठी रक्कम वाचली. लाडक्या बहिणींच्या यादीत कपात झाल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. हे असे होणारच होते.
ते लोकांच्या आता लक्षात आले आहे. ही विधानसभा निवडणुकीसाठी करदात्यांच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच होती, असा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री लाडकी बहिणी, आनंदाचा शिधा वा इतर सुरू करण्यात आलेल्या योजना, मतदारांना दिलेली लाच होती आणि ती तेवढ्या काळापुरती होती, असा घणाघात शेट्टी यांनी केला.
लाडक्या बहिणींत नाराजी
या राज्याची आर्थिक स्थिती नाजूक आहे, हे माहिती असताना सुद्धा त्यावेळचे मुख्यमंत्री, मंत्री यांनी विधानसभा निवडणुकीत जनतेची मते घेण्यासाठी हा बनवा केल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला. या फसवणुकीविरोधात महायुतीमधील नेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हायला हवेत, अशी जोरदार मागणी विरोधकांतून होत आहे. या योजनेतून पाच लाख महिला गायब झाल्या आहेत. अजून किती बहिणी गायब होतील हे समोर येईलच असे ते म्हणाले. एकूणच लाडकी बहीण योजनेतील कारवाईवरून आता नाराजीचा सूर आवळल्या जात असल्याचे समोर येत आहे.
सत्तेत येण्यासाठी स्कीम आणली होती : कडू
प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनीही या योजनेवरून सरकारला खडे बोल सुनावले आहेत. ही स्कीम लाडक्या बहिणीसाठी नव्हती तर सत्तेत येण्यासाठी होती, सत्तेत येण्यासाठी करोडो लाडक्या बहिणीची चाचपणी न करता त्यांना पैसे देऊन टाकले, असा आरोप बच्चू कडू यांनी केला. सरकारने मते घेतली मात्र आता लाडक्या बहिणींचे पैसे बंद करणार, ही त्यांची फसवणूक आहे, त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली त्या लाडक्या बहिणींनी आता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे असेही बच्चू कडू म्हणाले.
पाच लाख महिला अपात्र
लाडकी बहीण योजना जुलै २०२४ मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा केले जात होते. आतापर्यंत या योजनेचे सात हप्ते वितरित करण्यात आले आहेत. फेब्रुवारीचा हप्ता लवकरच खात्यात जमा केला जाणार आहे. दरम्यान, विरोधकांकडून या योजनेवर टीका सुरू झाली. यामागे कारणही आहे. योजनेसाठी अर्ज करताना सरकारी यंत्रणांनी निकषांकडे लक्ष न देता सरसकट अर्ज मंजूर केले होते.