कराची : वृत्तसंस्था
आज कराची येथून सिंधमधील नवाबशाह येथे जात असलेल्या नॅशनल असेंब्लीच्या सदस्या आणि माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या कन्या असिफा भुत्तो जरदारी यांच्या ताफ्याला सिंध प्रांतातील आंदोलकांनी रस्त्यात घेराव घातला. लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला.
जमशोरो टोल नाक्याजवळ ही घटना घडली. कालव्याच्या योजनेला विरोध करत असलेल्या आंदोलकांनी असिफा भुत्तो यांच्या ताफ्याला काही काळ अडवून ठेवले. तसेच लाठ्या-काठ्या घेऊन या ताफ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
आम्ही वादग्रस्त कालवा योजना आणि कॉर्पोरेट फार्मिंगला विरोध करत होतो, असे आंदोलकांनी सांगितले. ही योजना शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या विरोधात असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना घडल्यानंतर सुरक्षा दलांनी त्वरित कारवाई करत असिफा झरदारी यांच्या वाहनाला सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. तसेच ताफ्याला सुखरूपपणे तिथून बाहेर काढले.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार सिंध येथील जमशोरोचे एसएसपी जफर सिद्दिकी यांनी सांगितले की, असिफा झरदारी यांचा ताफा एक मिनिटापेक्षा कमी कालावधीसाठी अडवण्यात आला. त्यात कुठलंही नुकसान झालेलं नाही. कुठेही कायदा सुव्यवस्था भंग झाली तर पोलीस त्वरित कारवाई करतील. त्यांनी पुढे सांगितले की, या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आली आहे. तसेच काही संशयितांना अटक करण्यात आली आहे. जर कुणी सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल.