सोलापूर : राज्य शासनाने परिवहन संवर्गातील वाहनांना योग्यता प्रमाणपत्रासाठी आकारण्यात येणाऱ्या विलंब शुल्काचा निर्णय रद्द केला आहे. त्याबाबतचे परिपत्रक काढले आहे. याचा थेट फायदा सोलापुरातील सात ते आठ हजार रिक्षाचालकांना होणार आहे.
विलंब शुल्काचा निर्णय स्थगित झाल्याने रिक्षाचालकांचे आर्थिक नुकसान टळणार आहे. त्यामुळे सोलापूरमधील रिक्षाचालकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. राज्य शासनाने परिवहन संवर्गातील योग्यता प्रमाणपत्र घेण्याची मुदत संपून गेल्यावर त्यांना दररोज ५० रुपये दंड लागू केला होता. याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्याविषयीची याचिका फेटाळल्यानंतर १७ मे रोजी राज्याच्या परिवहन आयुक्तांनी दंड लागू करण्याचा निर्णय घेतला.
यामुळे राज्यभर विविध संस्था, संघटनांनी नाराजी व्यक्त करुन आंदोलने, निदर्शने केली होती. अखेर राज्य शासनाने मंत्री दादा भुसे यांनी पुढील आदेश येईपर्यंत विलंब शुल्क आकारण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याचे विधीमंडळात सांगितले. तरी सर्व वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी व आपली वाहने योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये सादर करावीत. यासंदर्भात सर्व प्रादेशिक तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.