जयपूर : भजनलाल शर्मा यांनी शुक्रवारी राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल कलराज मिश्रा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. प्रथम दिया कुमारी आणि नंतर प्रेमचंद बैरवा यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. जयपूरच्या अल्बर्ट हॉलमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपशासित राज्यांचे अनेक मुख्यमंत्रीही उपस्थित होते.
विशेष म्हणजे, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाला ते त्यांच्या राज्याचे मुख्यमंत्री झाले हा योगायोग आहे. तसेच शपथ घेण्यापूर्वी भजनलाल शर्मा यांनी जयपूर येथील मंदिरात जाऊन दशन घेतले. त्यानंतर त्यांनी घरी आई-वडिलांचे पाय धुवून त्यांचे आशीर्वाद घेतले. मंगळवारी भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यापूर्वी ३ डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या विधानसभा निकालात भाजपने १९९ पैकी ११५ जागा जिंकल्या होत्या.