23.5 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeनांदेडभंडारी बंधुंचे सुमारे २०० कोटींचे ‘भंडार’ जप्त

भंडारी बंधुंचे सुमारे २०० कोटींचे ‘भंडार’ जप्त

आयकर विभागाकडून मोठी कारवाई १४ कोटी रोख, ८ किलो सोने तब्बल ७२ तास सुरू होती कारवाई रोकड मोजण्यासाठी बँकांतील स्थानिक कर्मचा-यांची घेतली मदत

नांदेड : प्रतिनिधी
आयकर विभागाच्या पथकाने नांदेड शहरातील भंडारी बंधूंच्या निवासस्थानासह फायनान्स सेवा पुरवणा-या शाखांवरही धाड टाकून सोने, हिरे व रोकड असा सुमारे २०० कोटींच्या जवळपास ऐवज हाती लागला आहे. ऐन अक्षय्य तृतीयेच्या दिवशी टाकण्यात आलेल्या धाडीनंतर जवळपास चार दिवस संपत्तीची मोजदाद सुरू होती.

आयकर विभागाच्या नाशिकसह छत्रपती सभांजीनगर येथील आयकर विभागातील जवळपास ९० अधिकारी व कर्मचा-यांचा फौजफाटा अक्षय तृतीयेच्या पहाटे भंडारी बंधूंच्या निवासस्थानी धडकला. २५ ते ३० वाहनांमध्ये आलेल्या या अधिकारी व कर्मचा-यांनी प्रारंभीच सगळ्यांकडील मोबाईल जप्त करत घराच्या झाडाझडतीला सुरूवात केली होती. प्रारंभी घराची झाडाझडती सुरू केल्यानंतर काही अधिका-यांनी भंडारी यांच्या अलीभाई टॉवर व कोकाटे कॉम्प्लेक्स येथील शाखांवर छापे टाकले.

गेल्या चार दिवसांपासून निवासस्थान व कार्यालयातील नोंदींची तपासणी करण्यात येत होती. भंडारी कुटूंबियांच्या विविध ७ आस्थापना आहेत. त्यामध्ये सापडलेल्या कागदपत्रे, हार्डडिस्क, पेन ड्राईव्ह व रजिस्टरमधील नोंदीनुसार भंडारी कुटूंबियांकडे १७० कोटी रुपये किंमतीची संपत्ती आहे. तपासणीत त्यांच्या घरात १४ कोटी रुपये रोख, ८ किलो सोन्या -चांदीची दागिणे आणि सोन्याची बिस्कीटे असा ५ कोटी ६० लाख रुपयांचा ऐवज सापडला आहे. सोबतच काही हिरेही जप्त करण्यात आली आहेत. त्याचे मूल्यमापन तज्ज्ञ पारखींकडून करण्यात येत आहे. लोखंडी कपाटे, गाद्यांमध्ये भरून ठेवलेली रक्कम मोजण्यासाठी स्थानिक बँकेतील १५ कर्मचा-यांना पाचारण करण्यात आले होते. तसेच काही ठिकाणी खुले भूखंड असल्याची कागदपत्रेही हाती लागली आहेत.

कारवाईकडे नांदेडकरांचे लक्ष
जवळपास चार दिवसांपासून सुरू असलेल्या या कारवाईत सापडलेल्या ऐवजाचे मूल्यमापन करण्याचे काम मंगळवारी सकाळी पूर्ण झाल्यानंतर २०० कोटींच्या घरात संपूर्ण मालमत्ता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये नेमकी भंडारी यांनी किती कर चुकवला अथवा त्यांच्यावर कोणती दंडात्मक कारवाई करण्यात आली याची अधिकृत माहिती अजूनही समोर आली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR