सोनितपूर (आसाम) : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सोनितपूर जिल्ह्यात जमावाने अडवली तेव्हा राहुल गांधी बसमधून खाली उतरले. मात्र, त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांनी त्यांना बसमध्ये बसण्यास सुचवले. यावेळी उपस्थित लोक मोदी-मोदींच्या घोषणा देत होते.
या जमावाकडे भाजपचे झेंडे होते. गर्दीतील काही लोक राहुल गांधी यांच्या बससमोरही आले. यानंतर राहुल गांधींनी बसमधून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ड्रायव्हरला सांगितले, जरा थांब. यानंतर ते बसमधून उतरले. मात्र सुरक्षा पथकाने प्रसंगावधान लक्षात घेऊन त्यांना बसमध्येच ढकलून बसवले.
सोनितपूरमध्ये कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांच्या गाडीवर आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या कॅमेरा क्रूवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी जयराम रमेश यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांच्यावर आरोप केला. ते म्हणाले की, नि:संशयपणे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे सर्व घडवून आणत आहेत. आम्ही घाबरणार नाही, लढत राहू, असे ते म्हणाले.