27.9 C
Latur
Friday, October 4, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरभाऊबीजेची ओवाळणी अ‍ॅडव्हान्स देणार : उपमुख्यमंत्री पवार

भाऊबीजेची ओवाळणी अ‍ॅडव्हान्स देणार : उपमुख्यमंत्री पवार

लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा

परळी : महिलांच्या सक्षमीकरणासाठी व आत्मसन्मानासाठी महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही. पुढील पाच वर्ष ही चालू राहील असा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परळी (जिल्हा बीड)येथे जन सन्मान यात्रेच्या सभेप्रसंगी दिला.तसेच भाऊबीजेची ओवाळणी म्हणून लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्याचे तीन हजार रुपये १० ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील अशी घोषणाही याप्रसंगी उपमुख्यमंत्री पवार यांनी केली.

मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेचे परळी शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर येथील वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या लाडकी बहिणी व नागरिकांच्या संवाद सभेत अजित पवार बोलत होते. याप्रसंगी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, आमदार विक्रम काळे, अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, अडवोकेट विष्णुपंत सोळंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण , गोंिवदराव देशमुख, बबन लोमटे, फारुख पटेल, शिवाजी सिरसाट, परळी नगरपरिषदेचे माजी गट नेते वाल्मीक कराड, माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख, बाजीराव धर्माधिकारी, राजाभाऊ पौळ, लक्ष्मण पौळ, वैजनाथ सोळंके, सुशांत पवार, संध्या सोनवणे, संगीता तूपसागर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसमान यात्रेचे शहरात वाजत गाजत स्वागत करण्यात आले.
त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांचा समाचार घेतला. ते म्हणाले, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना आम्ही सुरू केल्याने विरोधकांना मळमळ होत आहे. परंतु आम्ही ही योजना यापुढे चालूच ठेवणार आहे. भाजप -शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुती सरकारने गोरगरिबांच्या कल्याणासाठी, शेतकरी, शेतमजुरांच्या हितासाठी, महिला-मुलींसाठी, होमगार्डसाठी व समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यापुढेही विकासासाठी केंद्र सरकारची मदत घेण्यात येईल.

बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. बीडला विमानतळ करण्यात येईल त्यामुळे जिल्ह्यात उद्योगधंदे वाढतील व बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, असा विश्वास ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे. याप्रसंगी खासदार सुनील तटकरे यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आगामी निवडणुकित पुन्हा महायुतीची सत्ता आणण्यासाठी राज्याच्या प्रचाराची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती दिली. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणातून बीड जिल्ह्यातिल महायुतीचे सहाही उमेदवार निवडून आणण्याचा संकल्प केला आहे. आगामी निवडणुकीसाठी मला टार्गेट केले जात आहे. परंतु परळी मतदारसंघातील मतदार माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे मी या मतदारसंघातून जिंकून येणारच आहे असा विश्वासही कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी याप्रसंगी बोलताना दिला.

दोन हप्त्यांच्या रकमेतून सुरू केला व्यवसाय
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या दोन हप्त्यांच्या रकमेतून स्वत:चा व्यवसाय सुरू करून एक आठवड्यात १२ हजार रुपयांचा नफा मिळवणा-या परळी येथील नेहरु चौकातील अक्षरा अक्षय शिंदे या महिलेचा अजित पवार व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे. आर्टिफिशियल वटवृक्ष तयार करण्याचा व्यवसाय अक्षरा शिंदे यांनी सुरू केला आहे. त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणातून त्यांचे कौतुक केले. आभार प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR