मुंबई : घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी भावेश भिंडेला राजस्थानच्या उदयपूरमधून ताब्यात घेतले. घाटकोपरमधील दुर्घटनेनंतर तो फरार झाला होता. मुंबई पोलीस त्याच्या शोधात होते. अखेर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्याला मुंबईमध्ये आणले जाणार आहे.
दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये अचानक पावसाला सुरुवात झाली होती. यावेळी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर पूर्वमधील एक महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळले. होर्डिंग इतके महाकाय होते की त्याने सर्व पेट्रोल पंपच व्यापला. पेट्रोल पंपाखाली असलेल्या गाड्या, माणसं त्याखाली अडकले. त्यामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. या अपघातात आतापर्यंत १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
होर्डिंग ज्या ठिकाणी होते, ती रेल्वेची जागा आहे. मात्र, होर्डिंग अनधिकृत होते. यासाठी मुंबई महानगरपालिकेने रेल्वे पोलिसांना जबाबदार धरलं आहे. सदर घटनेनंतर प्रशासन सक्रीय झालं आहे. मुंबई-पुण्यातील होर्डिंग हटवण्याचे आदेश सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहेत. प्रमुख शहरांमध्ये शेकडोंच्या संख्येने अनधिकृत होर्डिंग असल्याची माहिती मिळत आहेत. त्यांना आता हटवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५१ वर्षीय भावेश भिंडे याच्यावर होर्डिंग संदर्भात एकूण २६ गुन्हे दाखल आहेत. याशिवाय त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा देखील दाखल आहे. जेव्हा दुर्घटना घडली तेव्हापासून भिंडे नॉट रिचेबल होता. त्याचे शेवटचे लोकेशन लोणावळा येथे ट्रेस झाले होते. मुंबई पोलीस त्याठिकाणी पोहोचले होते. पण, त्यानंतर तो ऑफलाईन गेला होता. तेव्हापासून पोलीस भिंडेच्या मागावर होते. दरम्यान, घाटकोपर येथील बचावकार्य संपलं आहे. तब्बल ६० तास बचावकार्य सुरु होतं.