महाड : ऐतिहासिक महाडमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची माहिती देणारी भीमसृष्टी उभारण्यात येईल. यासाठी लागणारा निधी सरकार उपलब्ध करून देईल, अशी घोषणा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केली.
चवदार तळे सत्याग्रहाच्या ९८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, सामाजिक न्याय विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, डॉ. भदंत राहुल बोधी, समाज कल्याण अधिकारी सुनील जाधव, नागसेन कांबळे, आदी उपस्थित होते.
अबू आझमी यांनी काढली इन्साफ यात्रा
चवदार तळे सत्याग्रह स्मृतिदिन कार्यक्रमाला पहिल्यांदाच समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी हजेरी लावली. त्यांनी मुंबई ते महाड अशी इन्साफ यात्रा काढली. यावेळी त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलो आहे, असे सांगून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच आपण सुरक्षित आहोत असे स्पष्ट केले.