वर्धा : मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी वर्ध्यात आज ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या मेळाव्यात छगन भुजबळ यांची गैरहजेरी पाहायला मिळत आहे. भुजबळ यांची प्रकृती ठीक नसल्याने ते या सभेला उपस्थित राहू शकले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, या सभेला गर्दीच झाली नसल्याने भुजबळ यांनी सभेला येण्याचे टाळले असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
राज्यभरात ओबीसी मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत असून, आज वर्धा जिल्ह्यात ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती असणार होती. मात्र, भुजबळ यांची प्रकृती ठीक नसल्याने ते या सभेला उपस्थित राहू शकले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच, डॉक्टरांशी चर्चा करून उद्या ठाणे येथील सभेला जायचं की नाही? याबाबत छगन भुजबळ निर्णय घेणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
सभेला गर्दी नसल्याने जाण्याचे टाळले?
प्रकृती ठीक नसल्याने भुजबळ यांनी वर्धा येथील सभेत जाण्याचे टाळले असल्याचा दावा केला जात असतानाच, दुसरीकडे याच वर्ध्याच्या सभेत अपेक्षित गर्दीच झाली नसल्याचे चित्र आहे. सभेच्या ठिकाणी २५ हजार ओबीसी बांधव येतील असा अंदाज आयोजकांनी वर्तविला होता. त्यानुसार तयारी देखील करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात सभेच्या ठिकाणी ५०० च्या आतच लोक हजर असल्याचे दिसून आले. तर, या ओबीसी मेळाव्यात गर्दी नसल्यानेच भुजबळ सभेला आले नसल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.