27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रलासलगावमध्ये भुजबळांचा ताफा अडवला

लासलगावमध्ये भुजबळांचा ताफा अडवला

काळे झेंडे दाखवत ‘गो बॅक’च्या दिल्या घोषणा

नाशिक : राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मंत्री छगन भुजबळ आज नाशिकमध्ये नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा करत आहेत. मात्र मराठा समाजाने भुजबळांच्या पाहणी दौ-याला जोरदार विरोध पाहायला मिळत आहे. आधी भुजबळांना फोन करून आमच्या बांधावर येऊ नका असे सांगण्यात आले, त्यानंतर ज्या भागात ते गेले त्या भागात त्यांना काळे झेंडे देखील दाखवण्यात आले. तर लासलगावमध्ये छगन भुजबळांचा ताफा अडवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्यावरुन मराठा-ओबीसी संघर्ष पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते छगन भुजबळांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यामुळे छगन भुजबळांच्या पाहणी दौ-याला मराठा बांधवांनी जोरदार विरोध केला आहे.

येवला तालुक्यातील नुकसान पाहणी करून भुजबळ निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी निघाले होते. यावेळी भुजबळांचा ताफा लासलगाव कोटमगाव मार्गे जात असताना कोटमगाव येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखले. तसेच ताफा पुढे गेल्यानंतर आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवत ‘भुजबळ गो बॅक’च्या घोषणा देखील दिल्या होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR