मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना जातीपातीचे राजकारण करत नाही, असे शिवसेनाप्रमुखांनी सांगितल्यानंतरही छगन भुजबळ यांनी मंडल आयोगाच्या मुद्यावर शिवसेना सोडली होती. आता त्यांना आपल्या ओबीसी समाजावर अन्याय होत आहे असे वाटत असेल तर त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळातून बाहेर पडावे, असे थेट आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी भुजबळ यांना दिले.
मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात शासन निर्णय काढताना कोणालाही विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. याबाबत बोलताना संजय राऊत यांनी भुजबळ यांनी मंत्रीपद सोडावे असा सल्ला दिला. आपल्या समाजावर अन्याय झाला म्हणून भुजबळ मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकत असतील याचा अर्थ त्यांचा कॅबिनेट व मुख्यमंत्र्यांवर त्यांचा विश्वास नाही. त्यामुळे त्यांनी त्या मंत्रीमंडळातून बाहेर पडले पाहिजे. ओबीसींचे नेते म्हणून भुजबळ यांना पंतप्रधान मोदींनी विशेष लक्ष घालून मंत्रीमंडळात घेतले आहे. ते मंत्रीमंडळात आहेत ही नरेंद्र मोदींची कृपा आहे. मोदींनी सर्वांचा विरोध डावलून त्यांना मंत्रीमडंळात घेतले आहे. त्यामुळे आता भुजबळ जर नाराज असतील तर ते त्या संदर्भात मोदींची भेट घेतील व चर्चा करतील असा टोलाही राऊत यांनी लगावला.
सरकार अस्थिर करण्याचा आतल्याच लोकांचा प्रयत्न
मनोज जरांगेंचे आंदोलन हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी होते. परंतु, सरकारमधील काही घटक त्या आंदोलनाचा राजकीयदृष्टया गैरवापर करून फडणवीसांचे सरकार अडचणीत यावे, अशी त्यांची इच्छा होती, असा आरोपही राऊत यांनी केला. पण देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तात्काळ पावले उचलली. त्यानंतर ज्यांना हे घडवायचे होते, त्यांच्या सर्व योजना बारगळल्या असेही राऊत म्हणाले.