मुंबई : मी कोणतीही अपॉइंटमेंट न घेता आज पवारसाहेबांच्या भेटीसाठी गेलो होतो. तब्ब्येत बरी नसल्याने ते झोपलेले होते. त्यामुळे मी एक-दीड तास तिथे थांबलो. त्यानंतर ते उठले आणि आमची भेट झाली. यावेळी मी त्यांना सांगितले की, मी इथे कोणत्याही पक्षाचा नेता म्हणून किंवा आमदार, मंत्री म्हणून आलेलो नाही. पण राज्यात आरक्षणावरून सध्या काही जिल्ह्यांमध्ये स्फोटक स्थिती आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही आपली भूमिका मांडली पाहिजे, ही विनंती करण्यासाठी त्यांना भेटायला गेलो होतो अशी भूमिका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली आहे.
शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेलेले छगन भुजबळ यांना तब्बल दीड तासांच्या प्रतीक्षेनंतर भेटीची वेळ मिळाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा झाली. या भेटीनंतर भुजबळ यांनी आपल्या सरकारी निवासस्थानी येत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भेटीत कोणकोणत्या मुद्यांवर चर्चा झाली, याबाबतची माहिती दिली आहे.
ओबीसी समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे काम तुम्ही केले होते. मात्र आता राज्यात काही ठिकाणी तणावाची स्थिती आहे. मराठा समाजाच्या व्यक्तीच्या हॉटेलमध्ये ओबीसी समाजातील लोक जात नाहीत. जिथे ओबीसी समाजातील कोणाचे दुकान असेल तर तिथे मराठा समाजातील लोक जात नाहीत. ही स्थिती सुधारण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यावा असे आवाहन मी शरद पवार यांना केलं. त्यावर ते म्हणाले की, सरकारच्या लोकांनी जाऊन मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांना काय आश्वासन देण्यात आले, याबाबतची माहिती आमच्याकडे नाही.
हाकेंचे उपोषण कसे सुटले माहिती नाही
लक्ष्मण हाके यांचेही उपोषण कोणत्या आश्वासनावर सोडण्यात आले, याबाबत आम्हाला कल्पना नाही. मात्र मी पुढील एक-दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी यावर चर्चा करतो आणि यातून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेतो असा शब्द पवार यांनी आपल्याला दिल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
तणाव दूर करण्यासाठी मोदी-गांधींना भेटणार
महाराष्ट्रातील सामाजिक तणाव दूर करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करत असून यासाठी मी गरज पडल्यास काँग्रेस नेते राहुल गांधी किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासही तयार असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.