नाशिक : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेणारे नेते छगन भुजबळ यांनी नोव्हेंबर २०२३ मध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी याला दुजोरा दिला आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी अद्याप तो स्वीकारला नसल्याची माहिती आहे.
छगन भुजबळ यांनी राजीनाम्याच्या मुद्यावर बोलण्यास नकार दिला. मात्र, ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर कसल्याही प्रकारची तडजोड करणार नाही, त्यासाठी कोणत्याही थराला जायची तयारी असल्याचे भुजबळ म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही मात्र त्यासाठी ओबीसी समाजाला किंमत मोजावी लागू नये, असे भुजबळ म्हणाले. ओबीसींच्या हिताचे संरक्षण करणे ही प्राथमिकता असल्याचे छगन भुजबळ यांनी मीडियाशी बोलताना म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे १६ नोव्हेंबर २०२३ ला राजीनामापत्र दिल्याचे म्हटले आहे. जालन्यातील अंबडच्या सभेच्या एक दिवस अगोदर भुजबळांनी ते पत्र मुख्यमंत्र्यांकडे दिले होते. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारल्यास भुजबळांचे मंत्रिपद जाऊ शकते.