38.5 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रठाकरे गटाला मोठा धक्का, आमदार रवींद्र वायकर शिंदे गटात दाखल

ठाकरे गटाला मोठा धक्का, आमदार रवींद्र वायकर शिंदे गटात दाखल

मुंबई : प्रतिनिधी
ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी रविवारी रात्री ९ वाजता त्यांचा पक्षप्रवेश झाला. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी वायकर यांची मागच्या काही दिवसांपासून चौकशी सुरू होती. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

पक्षप्रवेशानंतर बोलताना रवींद्र वायकर म्हणाले की, मी मागच्या ५० वर्षांपासून शिवसेनेसोबत काम करत आलो आहे. तीनवेळा आमदार आणि अनेकदा नगरसेवक झालेलो आहे. आरेमधील ४५ किलोमीटरचे रस्ते होणे गरजेचे आहे. त्यासाठी १७३ कोटी रुपये पाहिजे आहेत. काही ठिकाणी पाण्याची सोय नाही. त्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. ते घेतले नाहीत तर लोक नाराज होतील. सत्तेमध्ये असल्यानंतरच हे कामे मार्गी लागतील, असे वायकर म्हणाले.

देशात आता मोदीसाहेबांची सत्ता आहे. ते चांगले काम करत आहेत. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे वेगवेगळे निर्णय घेत आहेत. माझे प्रश्न सुटले नाहीत तर मी लोकांसमोर जावू शकत नाही. त्यामुळे मी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांनी जो विचार दिला तो पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. वायकर यांनी जो निर्णय घेतला, तो कौतुकास्पद आहे. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न मला सांगितलेले आहेत. ते सोडवण्याचा सरकार म्हणून मी प्रयत्न करणार आहे.

वायकर यांचे काम मोठे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगभरात भारताचे नाव आदराने घेतले जाते. त्यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत. वायकर यांनी त्यामुळे शिवसेनेसोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. वायकर यांचे काम केवळ मतदारसंघापुरते नाही. संपूर्ण मुंबईसाठी वायकरांचे मोठे काम आहे. त्यांनी जो निर्णय घेतला, त्याचे मी स्वागत करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR