मुंबई : चालू फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून अंड्याच्या दरात चढ-उतार सुरूच असून, आज अंडी दरात मोठी घसरण झाली आहे.
मुख्यत्वे करून महाराष्ट्रासह देशातील सर्वच भागांमध्ये ही घसरण नोंदवली गेली असून, अंडी दर सध्या प्रति शेकडा ६०० रुपयांहून खाली घसरले आहेत. मागील आठवड्यात महाराष्ट्र आणि विशेषत: दक्षिणेकडील काही भागांमध्ये अंड्याचे दर हे शेकडा ६१५ रुपयांपर्यंत वाढलेले होते.
पूर्वेकडील पश्चिम बंगालमध्येही अंडी दराने ६०० रुपये प्रति शेकडा हा आकडा पार केला होता. मात्र आज कोलकाता या ठिकाणी थेट ५० रुपयांनी घसरण होऊन अंडी दर ५५० रुपये प्रति शेकडापर्यंत खाली आला आहे. तर महाराष्ट्रातही अंडी दरात प्रति शेकडा २० ते २५ रुपयांनी घसरण नोंदवली गेली आहे.
सध्याच्या घडीला देशातील अनेक भागांमध्ये उन्हाची तीव्रता वाढली आहे. ज्यामुळे अंडी बाजारात मागणी घटली असून, त्याचा थेट परिणाम दरांवर झालेला पाहायला मिळत आहे.