नवी दिल्ली : वृत्तसंस्था
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नर पदावरून निवृत्त झाल्यानंतर शक्तीकांत दास यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. दास आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून काम करणार आहेत. तशा आशयाचा आदेश केंद्र सरकारने काढला आहे. शक्तिकांत दास हे पंतप्रधानांचे दुसरे प्रधान सचिव असतील. २०१९ सालापासून पी. के. मिश्रा हे पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून काम करत असून त्यांच्यासोबतीला शक्तिकांत दासही काम करणार आहेत.
आरबीआय गव्हर्नर म्हणून सहा वर्षे सेवा केल्यानंतर शक्तिकांत दास डिसेंबर २०२४ मध्ये निवृत्त झाले. आता प्रधान सचिव या नात्याने ते पंतप्रधानांना प्रमुख आर्थिक धोरणात्मक सल्ला देण्याची भूमिका बजावतील. शक्तिकांत दास हे १९८० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. आरबीआयच्या गव्हर्नरपदी त्यांनी २०१८ ते २०२४ या दरम्यान काम केले. कोविड-१९ महामारी आणि त्यानंतर देशाची आर्थिक सुधारणा यासह महत्त्वपूर्ण आर्थिक आव्हानांचा सामना करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.