मुंबई : देशात पूजा खेडकर प्रकरण शांत होते ना होते तोच आता इतरही परीक्षांमध्ये तशाच पद्धतीचा घोटाळा होत असल्याचा आरोप केला जात आहे. केंद्र सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या सेक्शन ऑफिसर आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
सन २०२३ परीक्षेच्या मुलाखतीची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये कोणतीही पारदर्शकता नसून नावांमध्ये गोंधळ आहे आणि जात प्रवर्गच जाहीर न केल्यामुळे यामध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप होत आहे. तसेच या संस्थेत सध्या कार्यरत असलेल्या अधिका-यांच्या मुलांचा आणि नातेवाईकांचाच भरणा असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या संदर्भात काही विद्यार्थांनी सीएसआयआर आणि पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रारही केली आहे.
सीएसआयआर सीएएसई परीक्षेसाठी २०२३ मध्ये सेक्शन ऑफिसर आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसरच्या ४४४ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यासाठी या वर्षी फेब्रुवारीमध्ये टीअर १ परीक्षा पार पडली. ही परीक्षा ३५० गुणांची वैकल्पिक स्वरूपाची होती. तर टीअर २ परीक्षा ही वर्णनात्मक असून ती १५० गुणांसाठी जुलै महिन्यात घेण्यात आली. आता त्याचा निकाल लागला असून १०० गुणांची मुलाखत घेण्यात येणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सीएसआयआर संस्थेकडूनच घेण्यात येत आहे.
सीएसआयआर परीक्षेमध्ये मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी हे सध्या कार्यरत असलेल्या अधिका-यांचीच मुले आणि नातेवाईक असल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला. त्यामुळे या परीक्षेच्या पारदर्शकतेवर सवाल उपस्थित होत आहे. या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याने पंतप्रधान कार्यालयाच्या अख्यत्यारित असलेल्या या संस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला.