सोलापूर : जिल्ह्यात कोणत्याही पक्ष्याला बर्ड फ्ल्यूची बाधा झालेली नाही तरीही दक्षता म्हणून कर्मचा-यांना आठवडी बाजारात सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पक्षी पालक, शेतक-यांनी दक्षता घ्यावी. पक्ष्यांत बर्ड फ्ल्यूची लक्षणे आढळल्यास पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधावा.असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे यांनी सांगीतले.
राज्यातील लातूर, रायगड व ठाणे या तीन जिल्ह्यांत पक्ष्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला झाला असून जिल्ह्यात एकाही पक्ष्याला बर्ड फ्ल्यूची बाधा झालेली नाही. दक्षता म्हणून अंडी चांगल्या प्रकारे उकडून व चिकन शीजवून खा. पक्षी पालकांनी (पोल्ट्री फार्म) पशुसंवर्धन विभागाच्या सूचनांचे पालन करावे, अशा सूचना राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रदीपकुमार देवरे यांनी दिल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे यांनी दिली. बर्ड फ्ल्यूबाबत कोणीही अफवा पसरवू नये. पक्षी पालकांनी दक्षता घ्यावी. कोंबड्यांमध्ये या रोगाची लक्षणे आढळल्यास तत्काळ पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. नरळे यांनी केले आहे. रायगड जिल्ह्यातील चिरनेर (ता. उरण), ठाणे जिल्ह्यातील कोपरी (ता. ठाणे) येथे कुक्कुट पक्ष्यांत तर उदगीर (जि. लातूर) येथे कावळे दगावले. ते बर्ड फ्ल्यूने दगावल्याचे निदान भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने केले आहे.
या आजाराचा राज्यातील अन्य जिल्ह्यात फैलाव होण्याची आणि बाजारातील अंडी व चिकन विक्रीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन याबाबत जनजागृतीच्या सूचना पशुसंवर्धन आयुक्त डॉ. देवरे यांनी दिल्या आहेत. तसेच याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना पशुसंवर्धन कर्मचा-यांना दिल्या आहेत.
बर्ड फ्ल्यू हा मुख्यत्वे पक्ष्यांमध्ये आढळणारा आजार असून तो मनुष्यात आढळणे ही दुर्मिळ बाब आहे. तरीही सर्वेक्षण व इतर उपाययोजना केल्या जात आहेत. पोल्ट्री फार्म, कतलखान्यातील कर्मचारी, पशुपालन क्षेत्रातील नागरिक या जोखमीच्या गटातील एन्फ्ल्यूएंझा सदृश रुग्णांचे सर्वेक्षण अधिक सतर्कने करण्याच्या आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकरयांच्या सूचना आहेत. त्यानुसार अंमलबजावणी सुरू आहे. असे सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी सांगीतले.