परभणी/प्रतिनिधी
परभणी तालुक्यातून ३ हजार २०२ बांगलादेशीय रोहिंग्यांना प्रशासनाद्वारे जन्म प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले असुन यातील बहुतांश प्रमाणपत्र हे मागील सहा महिन्यातच वाटप झाल्याचा खळबळजनक दावा करीत या जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यातील संबंधितांविरुध्द कठोर कारवाई करून या षडयंत्राची अधिका-यांनी दखल घेवून या पध्दतीची बनावट प्रमाणपत्रे वितरित होणार नाहीत, याची खबरदारी घेतली पाहिजे, असा इशारा भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात माजी खा. किरीट सोमय्या यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार डॉ. राजापूरे आदी उपस्थित होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी खा. सोमय्या म्हणाले की, परभणी सारख्या छोट्या विभागातूनच ७० वर्षांपूर्वी जन्मलेल्या व्यक्तींना प्रशासनाने गेल्या सहा महिन्यात हजारोनिशी जन्म प्रमाणपत्र वितरित केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. जन्म प्रमाणपत्र प्राप्त करणारे बहुतांशी बांगलादेशी रोहिंगे आहेत.
काहींनी केवळ आधार कार्डच्या आधारावर जन्म प्रमाणपत्र प्राप्त केले आहेत. तर काहींनी स्वस्त धान्य दुकानातील अस्पष्ट असणा-या रेशन कार्डच्या प्रती देवून जन्म प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. हे प्रकार अत्यंत गंभीर असून थातूरमातूर पुराव्याच्या आधारे जन्म प्रमाणपत्र वितरित करणे म्हणजे एक प्रकारे देशद्रोहच असल्याचे ते म्हणाले. यात गुंतलेल्या संबंधितांविरुध्द निश्चितच कारवाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करणारच असल्याचे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की, संपूर्ण राज्यात बांगलादेशीय रोहिंगे हे पध्दतशीरपणे मुंबई, पुणे, नाशिक या महानगरांऐवजी मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जावून बनावट कागदपत्रे सादर करीत जन्म प्रमाणपत्र मिळवू लागले आहेत, यात एक मोठी गँगच कार्यरत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर, महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, माजी नगरसेविका सौ. मंगल मुदगलकर, बाळासाहेब जाधव, संजय रिझवानी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.