नवी दिल्ली/मुंबई : भारतात मिळणारी बिर्याणी ही जगात प्रसिद्ध आहे. भारतीय पदार्थांमध्ये बिर्याणीला दरवर्षी सर्वाधिक मागणी असते, यंदाही हे सिद्ध झाले आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजे १ जानेवारी २०२३ रोजी ऑनलाईन फूड डिलिव्हरी ऍप स्विगीवर ४.३ लाख बिर्याणी ऑर्डर करण्यात आली होती, तर ८३ हजार नूडल्सची ऑर्डर देण्यात आली होती.
स्विगीच्या मते, बिर्याणी ही सलग आठव्या वर्षी सर्वाधिक ऑर्डर केलेली डिश आहे. २०२३ मध्ये प्रत्येक सेकंदाला २.५ बिर्याणीची ऑर्डर देण्यात आली, त्यापैकी प्रत्येक ५.५ चिकन बिर्याणीमागे एक व्हेज बिर्याणीची ऑर्डर होती. बिर्याणीची ऑर्डर करणारे २४.९ लाख लोक स्विगी प्रथमच वापरणारे होते. हैदराबादमधील एका व्यक्तीने २०२३ मध्ये एकूण १,६३३ बिर्याणी ऑर्डर केल्या. भारत-पाकिस्तान विश्वचषक सामन्यादरम्यान चंदीगडमधील एका कुटुंबाने ७० प्लेट बिर्याणीची ऑर्डर दिली.
या सामन्यादरम्यान, स्विगीला दर मिनिटाला २५० बिर्याणीची ऑर्डर मिळाली. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या अंतिम वर्ल्ड कप सामन्याच्या दिवशी देशात दर मिनिटाला स्विगीवर १८८ पिझ्झाची ऑर्डर देण्यात येत होती. स्विगीने २०२३ मध्ये आपल्या ऍपवर वापरकर्त्यांद्वारे ऑर्डर केलेल्या खाद्यपदार्थाच्या ट्रेंडशी संबंधित डेटा जारी केला आहे, ज्यामुळे ही माहिती समोर आली आहे.
बिर्याणी चाहत्याची विक्रमी ऑर्डर
मुंबईतल्या एका व्यक्तीने वर्षभरात स्विगीवरुन ४२.३ लाख रुपयांचे जेवण ऑर्डर केले. स्विगीला बहुतांश ऑर्डर या चेन्नई, दिल्ली आणि हैदराबादमधून येतात. ऑनलाइन फूड ऑर्डर मध्ये छोटी शहरंही मागे नाहीत. झाशीमध्ये एकाच वेळी एकूण २६९ खाद्यपदार्थांच्या ऑर्डर आल्या होत्या. भुवनेश्वरमध्ये एका घरातून एकाच दिवसात २०७ पिझ्झाची ऑर्डर देण्यात आली होती आणि तेव्हा त्या घरात पिझ्झा पार्टी देखील नव्हती.
गुलाबजाम सर्वांत पसंतीची स्वीट डिश
भारतीयांना आता रसगुल्ल्यापेक्षा गुलाबजाम अधिक आवडतो. दुर्गापूजेदरम्यान गुलाबजामच्या ७७ लाख ऑर्डर देण्यात आल्या होत्या. गुलाबजाम व्यतिरिक्त नवरात्रीत नऊ दिवसांसाठी मसाला डोसा ही सर्वात आवडती व्हेज ऑर्डर होती. हैदराबादमधील एका व्यक्तीने २०२३ मध्ये इडलीच्या ऑर्डरवर ६ लाख रुपये खर्च केले.
बंगळुरू बनले केक कॅपिटल
बंगळुरूमध्ये २०२३ मध्ये ८५ लाख चॉकलेट केकची ऑर्डर देण्यात आली होती, त्यानंतर याला केक कॅपिटल ही पदवी मिळाली. २०२३ मध्ये व्हॅलेंटाईन डे, म्हणजेच १४ फेब्रुवारीला दर मिनिटाला २७१ केकची ऑर्डर देण्यात आली. नागपुरातील एका व्यक्तीने एकाच दिवसात ७२ केक मागवले.