22.3 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपा आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू

भाजपा आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू

मुंबई : भाजप आपला अजेंडा न लपवता उघडपणे आपल्या फुटीरतावादी भूमिकेचा प्रचार करतो. तर काँग्रेस आपला खरा अजेंडा लपवून हसतमुखाने बहुजनांना अडकवून त्यांचा गैरफायदा घेते. भाजप आणि काँग्रेस पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे बहुजनांनी समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे भाजप नागनाथ आणि काँग्रेस सापनाथ आहे,अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला जोरदार अपयशाचा सामना करावा लागला. २०१९च्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेली मते सुद्धा वंचितला या लोकसभा निवडणुकीत टिकवता आली नाहीत. लोकसभा निवडणुकीत वंचितच्या सर्वाधिक उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. निवडणुकीत जनाधार घटल्याचे खापर आंबेडकर यांनी महाविकास आघाडी विशेषत: काँग्रेसवर फोडले आहे. यासंदर्भात त्यांनी गुरुवारी एक्स या समाज माध्यमात पोस्ट टाकली आहे. मी पुढे जाऊन विजयी व्हावे असे काँग्रेसला वाटत नाही, असा आरोप आंबेडकर यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत आघाडी न झाल्याने वंचित बहुजन आघाडीला स्वतंत्र निवडणूक लढवावी लागली. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या समर्थकांनी वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम आहे अशी टीका केली असून या टीकेला हे उत्तर असल्याचे सांगत आंबेडकर यांनी एक्सच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर दररोज काँग्रेस समर्थक माझ्यावर आणि वंचित बहुजन आघाडीवर भाजपची बी-टीम असल्याचा आरोप करतात. मी भाजपची बी-टीम आहे का? मी त्याच प्रश्नांची वारंवार उत्तरे देऊन थकलो आहे. हा जातीय आरोप प्रत्येक भारतीय मुस्लिमाला विचारलेल्या प्रश्नासारखाच आहे. मी निवडणूक लढवतो म्हणून मी भाजपची बी-टीम आहे, असे म्हणणा-या लोकांना मला एकच सांगायचे आहे की मी निवडणूक का लढू नये? भारतात द्विपक्षीय व्यवस्था आहे का? असा सवाल आंबेडकर यांनी केला आहे.

मी काँग्रेसवर टीका करतो, पण मी भाजपवर सर्वाधिक टीका करतो हे त्यांना दिसत नाही. मी भाजपची बी-टीम आहे तर पैसा कुठे आहे? मी पुण्यात एका २ बीएचके फ्लॅटमध्ये राहतो. वंचित बहुजन आघाडी आणि माझ्या वैयक्तिक मालमत्तेची माहिती सार्वजनिक आहे आणि ती कोणीही मिळवू शकते. भाजपच्या ऑफर मी असंख्य वेळा नाकारल्याचे काळाने दाखवून दिले आहे. माझ्यावर भाजपची बी-टीम असल्याचा आरोप करणा-या नेत्यांनी आमच्या मुंबईतील पक्ष कार्यालयात यावे. आमचे पक्ष कार्यालय तुमच्या भव्य आधुनिक बाथरूमपेक्षा लहान आहे. आमचा पक्ष सर्वसामान्यांकडून मिळणा-या देणग्यांवर चालतो असेही आंबेडकर म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR