जालना : शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल करत टीका केली आहे. दडपशाही करून भाजपाने पक्ष फोडला आणि घरे देखील फोडली आहेत. मात्र, महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. अदृश्य शक्तीच्या बळावर संविधानाला बाजूला ठेवून निर्णय घेतले जात असून, हे दुर्दैवी असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
तर, शिवसेना पक्ष बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केला होता. मात्र, काल लागलेल्या निकालाची ऑर्डर इंग्रजीत वाचली. ऑर्डर दुसर्याने लिहिली, यांना वाचायला दिली,अशी दबक्या आवाजात चर्चा असल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. जालना जिल्ह्याच्या दौ-यावर असताना त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
दरम्यान, आरक्षणाच्या मुद्यावर देखील सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा, धनगर, लिंगायत समाजासह अन्य समाजाच्या आरक्षणाची मागणी सातत्याने केली जात आहे. आताच्या सत्ताधा-यांनी सत्ता स्थापन करण्यापूर्वी छातीठोकपणे आरक्षण देण्याची भाषा केली होती. आज दहा वर्षे लोटली, कुणाला दिले आरक्षण? असा खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला.
पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावे…
राज्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात दुष्काळी परिस्थिती असून, पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने सर्व कार्यक्रम बाजूला ठेवून पाणीप्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले पाहिजे. दुष्काळी परिस्थितीबाबत आपण अगोदरच केंद्र सरकारला पत्र पाठवले आहे. याशिवाय विकासाच्या प्रत्येक मुद्यावर आपण संसदेत नेहमीच आवाज उठवित आलो आहोत असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.