24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeसोलापूरभाजपने ओबीसींच्या अधिकारांचे संरक्षण केले नाही

भाजपने ओबीसींच्या अधिकारांचे संरक्षण केले नाही

माढा – आरक्षणावर डल्ला मारून जुनी व्यवस्था नव्या रितीने कार्यरत करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. भाजपने ओबीसींच्या अधिकारांचे संरक्षण केले नसल्याची टीका करतानाच या बेभरवशाच्या भाजपमुळे जे पदरात आहे तेही जाण्याची भीती वंचित बहुजन आघाडीचे अँड. प्रकाश आंबेडकर यांनी माढा येथील ओबीसी एल्गार सभेत व्यक्त केली.

या सभेस वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते इम्तियाज नदाफ, लक्ष्मण गायकवाड, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, टी. बी. मुंडे, रामोशी समाजाचे नेते अनंत चव्हाण, आग्री समाजाचे नेते जे. डी. तांडेल, रफीक कुरेशी, कुणबी समाजाचे नेते चंद्रकांत बावकर, नाभिक समाजाचे नेते सोमनाथ साळुंखे उपस्थित होते. मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्यास मार्गदर्शन करताना अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, सत्ता असेल तर आपण विकसित होऊ शकतो. त्यामुळे येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या आहेत, भाजप ओबीसींचे हित करणार होते. मात्र, भाजपने यासंदर्भात काहीच केले नाही. असे म्हणत अ‍ॅड. आंबेडकर यांनी जास्तीत जास्त ओबीसी लोकसभा, विधानसभेत गेले पाहिजेत, यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.

भाजप सत्तेत आल्यास लोकशाही व्यवस्थेने आपल्याला दिलेले अधिकार शाबूत राहणार नाहीत, असे सांगत भारतीय जनता पक्ष हा बेभरवशाचा पक्ष आहे. गेल्या तीस वर्षांत, दोन टक्के ओबीसी नव्हता आता १५ टक्के ओबीसी आयएएसमध्ये आहे, आरक्षणामुळे हे शक्य झाले आहे. त्यांना हे थांबवायचे आहे हे लक्षात घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. भाजपला सत्तेवरती आपणच बसवले आहे. त्यांनीच आपला घात केला आहे. आपल्याकडे केवळ नोकरी आणि शिक्षणात आरक्षण आहे, संविधान बदलण्याचे भाजपचे षड्यंत्र असल्याचा आरोप करत महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातील २७ टक्के हिस्सा ओबीसीला गेला पाहिजे, अशी आग्रही भूमिका अ‍ॅड. आंबेडकर यांनी मांडली. याच मेळाव्यास मार्गदर्शन करताना ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मराठा समाजास दिलेले आरक्षण न्यायालयात टिकणार नसल्याचे सांगितले. दुसरीकडे ओबीसी आराक्षण टिकविण्यासाठी न्यायालयीन लढ्यासाठी तयार राहण्याचे आवाहनही शेंडगे यांनी केले.

पिवळा आणि निळा झेंडा एकत्र येऊन आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये ओबीसींचेच सरकार येईल, आलेले सरकार हे आरक्षण रद्द करेल असे सांगत उपमुख्यमंत्री फडणवीस या संदर्भात गप्प का आहेत असा सवाल त्यांनी केला. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये ओबीसींचाच उमेदवार देणार असल्याचे शेंडगे यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR