नाशिक : प्रतिनिधी
सिन्नर येथील भारतीय जनता पक्षाचे विधानसभा अध्यक्ष जयंत आव्हाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांचा महिलेला अर्वाच्य शिवीगाळ करणारा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. भाजपच्या कार्यालयात झाडलोट करणा-या युवतीबाबत हा प्रसंग घडला आहे.
गेल्या दीड महिन्यापासून वेतन न मिळाल्याने ही युवती त्यांच्याकडे वेतनाची मागणी करीत होती. यावेळी त्यांनी या युवतीला शिवीगाळ केली. या युवतीला हाकलून देत दमबाजी केली. भाजप कार्यालयातच हा प्रकार घडला.
विशेष म्हणजे यावेळी पक्षाचे वरिष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे आणि अन्य दोन कार्यकर्ते उपस्थित होते. यातील कोणीही आव्हाड यांना रोखण्याचा किंवा समज देण्याचा प्रयत्न केला नाही.
नागरिकांमध्ये या घटनेबाबत संताप व्यक्त होत आहे. आव्हाड यांनी यापूर्वी देखील सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अशाच प्रकारे कायदा हातात घेतल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्ष त्यांच्यावर कारवाई करतो की नाही, याची उत्सुकता आहे.
हा व्हीडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. त्याची दखल अनेक नेत्यांनी घेतली आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी हा व्हीडीओ एक्सवर टाकला आहे.
संबंधित महिलेला पोलिसांनी न्याय दिला नाही. हे प्रकरण कलम ३५४ प्रमाणे विनयभंगाचे आहे, तशी तक्रार करूनही पोलिसांनी मात्र भाजपच्या या वादग्रस्त पदाधिका-याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप अंधारे यांनी केला.
भारतीय जनता पक्षाचे नेते आमचा पक्ष हा साधनशुचिता मानणारा पक्ष आहे. इतरांपेक्षा वेगळा आहे, सभ्यता पाळणारा आहे, असे सांगतात मात्र सिन्नर येथील जयंत आव्हाड यांच्या वर्तनाने त्यावर बोळा फिरला आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.