परभणी : लोकसभा निवडणूकीत अपेक्षेएवढे यश मिळाले नाही म्हणजे आपला पराभव झाला असे नाही. केंद्रात स्पष्ट बहुमताद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार तिस-यांदा आरुढ झाले आहे. त्यामुळे नेते मंडळींसह कार्यकर्त्यांनी नव्या उमेदीने, जल्लोषाने कामास लागावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे नेते रावसाहेब दानवे यांनी केले आहे. येथील अक्षदा मंगल कार्यालयात शनिवारी आता लक्ष विधानसभा या पार्श्वभूमीवर जिल्हा विस्तारित कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. मेघना साकोरे-बोर्डीकर, जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, ज्येष्ठ नेते विजयराव वरपुडकर, उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर, माजी महानगराध्यक्ष आनंद भरोसे, विद्यमान महानगराध्यक्ष राजेश देशमुख, विठ्ठलराव रबदडे, भागवतराव बाजगीर, विलास बाबर, मोहन कुलकर्णी, राजेश देशपांडे, मधुकर गव्हाणे, सुभाष आंबट, सुरेश भुमरे, भिमराव वायवळ, अनुप शिरडकर, मंगलताई मुदगलकर, डॉ. विद्या चौधरी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी मंत्री दानवे म्हणाले की, आता तर केंद्रात व राज्यात सरकार तुमचे आहे, पार्टी तुमची आहे. त्यामुळे स्थानिक नेतृत्वासह सामान्य कार्यकर्त्यांनी स्वत: विकसित व्हावे, स्वत:सह पार्टी भोवती माणसे उभी करावीत. आपआपसात असमन्वय, समज-गैरसमज, एकमेकांचे उणेधुणे, उखाळ्या-पाखाळ्या, गा-हाणे करण्याऐवजी प्रत्येकाने स्वत: व पार्टीच्या पाठीशी कितपत माणसे उभे करू, योगदान देवू या दृष्टीनेच विचार केला पाहिजे असे दानवे यांनी सांगितले.
यावेळी आ. मेघना बोर्डीकर, ज्येष्ठ नेते वरपुडकर, उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष वाकोडकर, भरोसे, विलास बाबर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य कुलकर्णी आदिंची भाषणे झाली. या मेळाव्यास संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.