नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेवरून सातत्याने निदर्शने करण्यात येत आहेत. या मुद्यावरून भाजप आम आदमी पक्षाला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहे. दिल्ली भाजप महिला मोर्चाने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या फिरोजशाह रोडवरील निवासस्थानाबाहेर गुरूवारी निदर्शने केली. दिल्ली पोलिसांनी आंदोलनकर्त्या महिलांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे.
दिल्ली भाजप महिला प्रदेशाध्यक्ष ऋचा मिश्रा पांडे आणि माजी प्रदेशाध्यक्ष महिला मोर्चा योगिता सिंह यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी हातात पोस्टर घेऊन अरविंद केजरीवाल सरकारचा निषेध केला. योगिता सिंह म्हणाल्या की, आज आम्ही अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर शांतता मार्गाने निदर्शने करत आहोत. पंजाबमध्ये आश्वासन दिले आहे. तिथे पैसे देणार का?, याचा जाब विचारण्यासाठी आलो आहोत. ते बनावट माध्यमांद्वारे लोकांची नोंदणी करत आहेत आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांचा वैयक्तिक डेटा देखील गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. १००० रुपये देण्याचे आश्वासन यापूर्वी दिले होते मात्र, ते आजतागायत दिलेले नाही. निवडणुकीपूर्वी पुन्हा २१०० रुपयांचे आश्वासन देण्यात आले जे पूर्णपणे खोटे आहे, अशा प्रकारे महिलांची फसवणूक होत असल्याची तक्रारही आम्ही पोलिसांत करणार आहोत.
केजरीवालांवर कायदेशीर कारवाई करू
दिल्ली भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा ऋचा मिश्रा पांडे यांनी सांगितले की, अरविंद केजरीवाल यांनी संपूर्ण दिल्लीत फसव्या पद्धतीने मते गोळा करण्यासाठी एक खोटी योजना चालवली आहे. ज्यामध्ये महिलांना २१०० रुपये दिले जातील असे सांगण्यात आले आहे. हे तेच अरविंद केजरीवाल आहेत ज्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी पंजाबमध्ये एक हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. पण ते आजपर्यंत मिळालेले नाही, म्हणून आज आम्ही केजरीवाल यांना हा प्रश्न विचारण्यासाठी आलो आहोत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.