अकोला : अकोल्यातील अकोटमध्ये गेल्याच आठवड्यात भाजपने एमआयएम पक्षासोबत युती केली होती. यावरून मोठा गदारोळ झाल्यानंतर युती तोडण्यात आली. तर तिकडे अंबरनाथमध्येही भाजपने काँग्रेससोबत युती केली होती. या दोन्ही ठिकाणी भाजपने संबंधित पदाधिका-यांना नोटीस बजावत कारवाई करणार असल्याचे सांगितले होते.
अकोटच्या नगरपालिकेत आज स्वीकृत सदस्य निवडण्याच्या प्रक्रियेत भाजप-एमआयएम युती वेगळ्या स्वरूपात पाहायला मिळाली. एमआयएमकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी एमआयएमकडून ताज राणा यांचे नाव समोर आले होते, तर भाजपकडून माजी नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया यांचा मुलगा जितेन बरेठिया यांनाही उमेदवारी दिली. यात ताज राणा यांनी वेळ निघून गेल्यावर उमेदवारी दाखल केल्याचे कारण देत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आला नसल्याचे सांगितले. तसेच एमआयएमच्या पाचही नगरसेवकांनी भाजपच्या जितेन बरेठिया यांना समर्थन दर्शवल्याने ही भाजप-एमआयएमची अप्रत्यक्ष युतीच असल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, अकोल्याच्या अकोटमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या भाजप-एमआयएम युतीवर चांगलाच गदारोळ निर्माण झाला होता. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही युती तोडण्याचे आदेश दिले. तसेच युतीसाठी जबाबदार धरत स्थानिक आमदार प्रकाश भारसाखळे यांना भाजपने कारने दाखवा नोटीस पाठवली. या घटनेनंतर एमआयएम भाजपच्या नेतृत्वाखालील अकोट विकास मंचातून बाहेर पडला होता. यानंतर एमआयएमच्या पाच नगरसेवकांनी स्वत:चा गट स्थापन केला होता. मात्र, पहिल्या युतीने वाद झाल्यानंतर आज परत ही युती नव्याने वेगळ्या रूपात समोर आली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी आता काही दिवस शिल्लक असताना राज्यात विविध ठिकाणी घडामोडींना वेग आला आहे. प्रचारसभा, तसेच उमेदवारांची पळवापळवी देखील सुरू असल्याचे काही ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीचा निकाल नेमका काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

