नागपूर : नागपुरातील भाजपचे बंडखोर उमेदवार किसन गावंडे हे या हायव्होल्टेज नाट्याचे केंद्रबिंदू ठरले आहेत. पक्षाकडून उमेदवारी मागे घेण्याचा दबाव वाढत असतानाच, गावंडे यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत थेट त्यांच्या घरालाच कुलूप ठोकले.
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांनी आता निर्णायक टप्प्यात प्रवेश केला असतानाच उमेदवारी न मिळालेल्या नाराज इच्छुकांनी बंडाचे निशाण फडकावल्याने सर्वच प्रमुख राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत दुपारी ३ वाजेपर्यंत असल्याने, बंडखोर उमेदवारांना मनवण्यासाठी नेत्यांची धावपळ सुरू होतीे. कुठे समजूत, कुठे दबाव, तर कुठे राजकीय तोडगे वापरले जात असताना नागपुरात मात्र राजकारणाला थेट थरारक वळण मिळाल्याचं पाहायला मिळालं. अर्ज माघारी घेऊ नये, यासाठी समर्थकांनी थेट भाजपच्या बंडखोर उमेदवारालाच घरात कोंडून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
समर्थकांनी पक्षावर गंभीर आरोप करत सांगितले की किसन गावंडे यांना सुरुवातीला पक्षाकडून अधिकृत एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र नंतर अचानक उमेदवारी मागे घेण्यास सांगितले जात असून त्यासाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव टाकला जात आहे. या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठीच समर्थकांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या मते, हा भाग सातत्याने दुर्लक्षित राहिला असून यापूर्वीही चारही उमेदवार इतर भागांतून देण्यात आले होते. त्यामुळे यंदा तरी या भागातून एक उमेदवार मिळावा, ही कार्यकर्त्यांची ठाम आणि रास्त मागणी आहे.
या संपूर्ण प्रकरणावर स्वत: किसन गावंडे यांनीही माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, पक्षाने मला अधिकृत एबी फॉर्म दिला होता. मात्र आता अचानक उमेदवारी मागे घेण्यास सांगण्यात येत आहे. मी अर्ज मागे घेण्यासाठी जात होतो, पण माझ्या कार्यकर्त्यांनी घराला कुलूप लावून मला बाहेर जाण्यापासून रोखले आहे. गावंडे यांच्या या विधानामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. उमेदवारी मिळाल्यानंतर ऐनवेळी माघार घेण्यास सांगणे हे अन्यायकारक असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
या नाट्यमय घटनेत भावनिक बाजूही समोर आली आहे. किसन गावंडे यांच्या आईने माध्यमांशी बोलताना, माझ्या मुलाला लढू द्या, अशी आर्त मागणी केली. एका आईने आपल्या मुलासाठी केलेली ही विनंती राजकारणाच्या कठोर वास्तवाला मानवी स्पर्श देणारी ठरली आहे. उमेदवारी, पक्षनिष्ठा आणि कार्यकर्त्यांचा संघर्ष या सगळ्यात कुटुंबीयही ओढले जात असल्याचे या प्रसंगातून दिसून येत आहे. निवडणूक राजकारण केवळ राजकीय नसून त्याचे सामाजिक आणि भावनिक परिणामही किती खोलवर जातात, हे या घटनेने अधोरेखित केले आहे.

