22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeधाराशिवभाजपाची चाणक्य नीती, सावंतांची नाराजी मविआच्या पथ्यावर

भाजपाची चाणक्य नीती, सावंतांची नाराजी मविआच्या पथ्यावर

धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव लोकसभा मतदारसंघ महायुतीमध्ये शिवसेनेच्या (शिंदे गट) प्रखर विरोधामुळे भाजपाला मिळत नसल्याने भाजपाच्या चाणक्यांनी चाणक्य नीती (तिरकी चाल) खेळत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) सोडून दिला. विशेष म्हणजे राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नव्हता. महायुतीमधील शिवसेना (शिंदे गट) सोडून सर्व घटक पक्ष एकत्र आले व त्या सर्वांनी भाजपाचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन लोकसभेची उमेदवारी दिली. या सामूहिक पक्ष प्रवेश सोहळ्याला राष्ट्रवादीचे नेते, भाजपाचे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सर्व आमदार, उमरगा येथील शिवसेनेचे आ. ज्ञानराज चौगुले उपस्थित होते.

भाजपाच्या तिरक्या चालीमुळे पालकमंत्री शिवसेना नेते प्रा. सावंत नाराज झाले असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी अर्चनाताई पाटील यांच्या उमेदवारीला उघड व प्रखर विरोध सुरू केला आहे. उमेदवार बदला, अन्यथा वेगळा विचार करू, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. भाजपाची तिरकी चाल व पालकमंत्री सावंतांच्या कार्यकर्त्यांची प्रचंड नाराजी महाविकास आघाडीचे उमेदवार खा. ओमराजे निंबाळकर यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
धाराशिव लोकसभा मतदारसंघ महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार गट) देण्यात आला आहे. विशेष म्हणजे महायुतीमध्ये शिवसेना (शिंदे गट) व भाजपाकडे सक्षम व तगडे उमेदवार होते. परंतु, राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नसतानाही भाजपामधून आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांना आयात करून उमेदवारी देण्यात आली. यामध्ये भाजपाची तिरकी चाल असल्याचे स्पष्ट होत आहे. शिवसेनेला (शिंदे गट) उमेदवारी मिळाली नसल्याने व पारंपरिक विरोधक असलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करावे लागणार असल्याने पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आहेत.

परिणामी शिवसेनेच्या अनेक पदाधिका-यांनी राजीनामे देऊन आपला राग व्यक्त केला आहे. पालकमंत्री सावंत यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी उमेदवार बदलावा म्हणून २ हजार गाड्यांचा ताफा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी घेऊन गेले. उमेदवार बदला, तुम्ही जो उमेदवार द्याल, त्याला अडीच लाखाच्या फरकाने निवडून आणू, असे आश्वासन धनंजय सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. धाराशिवच्या जागेबाबत पुनर्विचार करू, आपणाला मोदी यांना पुन्हा तिस-यांदा पंतप्रधान करायचे आहे. त्यामुळे महायुतीचा कोणीही उमेदवार असेल, त्याला निवडून आणण्याची आपली जबाबदारी आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे यांची जागावाटपाच्या निमित्ताने बरीच दमछाक होताना दिसत आहे. राज्यातील शिवसेनेच्या काही विद्यमान खासदारांना भाजपच्या दबावामुळे पुन्हा उमेदवारी देता आलेली नाही. याशिवाय काही लोकसभा मतदारसंघातील जागा राखण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांना संघर्ष करावा लागत आहे. अशातच सोमवारी, दि. ८ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी धाराशिव जिल्ह्यातील नाराज शिवसैनिकांचा जमाव येऊन धडकला.

धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांना धाराशिव लोकसभेतून उमेदवारी मिळावी, या मागणीसाठी धनंजय सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर शक्तिप्रदर्शन केले.

धाराशिव लोकसभेची जागा शिवसेनेला मिळाली नाही तर आम्ही राष्ट्रवादीचे काम करणार नाही, अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. धाराशिवच्या जागेबाबत भाजपने खेळलेली तिरकी चाल, त्यातच पालकमंत्री सावंत यांच्या कार्यकर्त्यांची नाराजी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पोषक ठरत असल्याचे चित्र आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR