19.2 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeधाराशिवशिंदे, पवार यांनाच संपविण्याचा भाजपचा कट

शिंदे, पवार यांनाच संपविण्याचा भाजपचा कट

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचा भाजपवर हल्ला

धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज आज मोठ्या शक्तिप्रदर्शनाने दाखल करण्यात आला. यानंतर झालेल्या सभेत आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार, माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी भाजपावर गंभीर आरोप केला. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे नाव घेत त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी फोडली, त्यावेळी भाजपला आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना संपवायचे आहे, असे वाटत होते. परंतु सद्यस्थितीत भाजपचा खरा कट एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या विरोधात असल्याचे वाटत असल्याचा घणाघात त्यांनी केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत मी पुन्हा आलो, पण दोन पक्ष फोडून आलो, असे म्हटले होते. याच वाक्याचा संदर्भ घेऊन माजी मंत्री अमित देशमुख यांनी भाजपावर आरोप केला आहे. शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांना बरोबर घेत भाजपाची सत्ता स्थापन झाली. त्यानंतर बरोबर वर्षभराने अजित पवारही महायुतीत सहभागी झाले. त्यांचाही पक्ष फुटला. असे असले तरीही लोकसभेच्या जागावाटपावरून दोन्ही नेते म्हणजेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा आहे.

महायुतीतल्या काही जागांचा तिढा अद्यापही सुटलेला नाही, असे सांगत राज्यात महायुतीत कोण कोणत्या पक्षात आहे? कोण कुणाचा अर्ज भरणार आहे, कोण कुणाचा प्रचार करणार आहे? कुणाच्या तिकिटावर कोण उभे राहणार आहे काहीही कळायला मार्ग नाही. भाजपाने फोडाफोडी केली. जी काही फोडाफोडी झाली त्यावरून आपल्याला वाटत होते की, भाजपाला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना राजकीयदृष्ट्या संपवायचे आहे. मात्र, महायुतीत आता जे काही चालले आहे, त्यावरून भाजपाचा खरा कट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात असल्याचे वाटत आहे, असे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी म्हटले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाजप, शिंदे गटावर जोरदार हल्ला चढविला, तर आमदार रोहित पवार यांनी भाजप आणि अजित पवार गटावर टीकास्त्र सोडले.

महाविकास आघाडीला ३९ जागा मिळतील
निवडणूक आयोगाने ज्यांना मूळ पक्ष म्हणून मान्यता दिली ते कमी जागा लढवत आहेत आणि जे पक्ष खोटे ठरवले आहेत ते जास्त जागा लढवत आहेत. आमच्या हाती एक सर्व्हे आला आहे. त्यानुसार राज्यात महाविकास आघाडीला ३९ तर महायुतीला अवघ्या ९ जागा मिळतील असं चित्र आहे असंही यावेळी अमित देशमुख म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR