नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. हिंदी भाषिक राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये मिळालेल्या दणदणीत विजयाने उत्साही झालेल्या भाजपने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विरोधकांकडून बैठकांचा जोर सुरू असताना आता भाजपकडून पुढील महिन्यातच थेट उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपकडून उमेदवारांची घोषणा सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वीच उमेदवारांची घोषणा सुरू होणार आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पहिली यादी जाहीर होऊ शकते. पुढील वर्षी २२ जानेवारीला रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर भाजप लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये निवडणुका जाहीर होण्यापूर्वी भाजपने उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे उमेदवारांना प्रचाराची संधी मिळते, असे पक्षाचे मत आहे. तीन हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपला मोठा विजय मिळाल्याने याचा फायदा झाल्याचे मानले जात आहे.