28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रकसबामधून ब्राह्मण उमेदवारास प्रतिनिधित्व द्या

कसबामधून ब्राह्मण उमेदवारास प्रतिनिधित्व द्या

पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर येत आहे. कसबामधून ब्राह्मण समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी अशी मागणी करणारे पत्र ब्राह्मण संघटनेने प्रसिद्ध केले आहे.

भाजप आणि शिवसेना शिंदे गट हिंदुत्ववादाचा प्रचार करत असल्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणुकीत राज्यभरात किमान ३० ब्राह्मण उमेदवार उभे करावेत, असे या पत्रात म्हटले आहे. तसेच कसबा मतदारसंघ हा ब्राह्मण बहुल असल्याने या ठिकाणी ब्राह्मण समाजातील व्यक्तीला प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी ब्राह्मण समाजाचे भालचंद्र कुलकर्णी यांनी केली आहे.

कसबा मतदारसंघात पुन्हा हेमंत रासने यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात असताना ब्राह्मण समाजाच्या मागणीचे पत्र पुढे आले आहे. या मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत ब्राह्मण समाजाच्या नेत्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नसल्यामुळे ब्राह्मण समाज नाराज झाला होता. या नाराजीचा फटका देखील भाजपला बसला होता. आता विधानसभा निवडणुकीत ब्राह्मण उमेदवार देण्याची मागणी केल्याने भाजपसाठी डोकेदुखी वाढल्याचे समजते.

या मतदारसंघातून स्व. मुक्ताताई टिळक, स्व. गिरीश बापट, स्व. अण्णा जोशी, स्व. डॉ अरविंद लेले यांनी प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे आता ब्राह्मण उमेदवाराला संधी द्यावी असे पत्रात म्हटले आहे. सकल ब्राह्मण समाजाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पत्रातून ब्राह्मण समाजाने कायमच भाजपला साथ दिल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार मुक्ता टिळक यांनी विजय मिळवला होता. त्यांनी ७ लाख ५ हजार ४९२ मते मिळवत काँग्रेसच्या अरविंद शिंदे यांचा पराभव केला होता. २२ डिसेंबर २०२२ रोजी मुक्ता टिळक यांचे निधन झाल्यानंतर मार्च २०२३ मध्ये येथे पोटनिवडणूक झाली होती. या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासनेंचा पराभव केला होता. धंगेकरांनी तेव्हा ११ हजार ४० हजार मतांनी विजय मिळवला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR