परभणी : सरकार येण्यापूर्वी कर्जमाफी करू असे आश्वासन महायुतीने शेतक-यांना दिले होते. आता मात्र, शेतक-यांना कर्ज भरा असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. त्यांच्या याच भूमिकेचा परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निषेध करण्यात आला आहे. परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत कांद्याचा आणि कापसाचा हार घालून काळी गुढी उभारली आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा निषेधही स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आला आहे. सरकारने शेतक-यांना तत्काळ कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा अशी मागणी ही यावेळी करण्यात आली आहे. आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटना कर्जमाफीच्या मुद्यावरुन आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं. कर्जमाफीच्या आश्वासनाची सरकारनं पूर्तता केली नाही. त्यामुळे यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील देण्यात आली.
विधानसभा निवडणुकीत काही गोष्टी घडल्या होत्या. आर्थिक शिस्त गरजेची असते. त्याप्रमाणे मी अर्थसंकल्प सादर केला. विरोधकांनी जी टीका करायची ती केली. आम्ही वास्तववादी भूमिका घेऊन अर्थसंकल्प सादर केला. मी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो, मला थोडीशी तरी अक्कल आहे. सगळी सोंग करता येतात पैशाचे सोंग करता येत नाही. काहींनी निवडणुकीच्या आधी कर्जमाफी बाबत वक्तव्य केले होते.
मी राज्यातल्या जनतेला सांगतो ३१ तारखेच्या आत कर्जमाफीचे पैसे भरा. जे आधी सांगितले होते, ते प्रत्यक्षात येत नाही.आता तशी परिस्थिती नाही भविष्यातील परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेऊ. या वर्षी आणि पुढच्या वर्षीची पीक कर्जमाफी होणार नाही, तशी आपली परिस्थिती नाही, असे स्पष्टपणे अजित पवारांनी म्हटले आहे. ते बारामतीमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या मेळाव्यात बोलत होते.