पुणे- लोणावळ्यामध्ये सध्या साता-याच्या कास पठाराचा फिल मिळत आहे. लोणावळ्याचं मिनी कास पठार पाहण्यासाठी पर्यटकांची तुफान गर्दी होत आहे. हिरवा निसर्ग, फुलांचा बहर, धुके आणि थंडी अशा वातावरणात फिरताना पर्यटक हरखून जात आहेत. येथील निसर्गसौंदर्य पर्यटकांना आकर्षित करत आहे.
मावळ तालुक्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेल्या मावळ तालुक्यात पावसाळा सुरू झाला की निसर्गाची किमया पहायला मिळते. येथील निसर्ग पावसाळ्यापासून बहरायला लागतो. मात्र, आता परतीचा पाऊस सुरू झाला आणि पुन्हा एकदा मावळचा निसर्ग बहरू लागला आहे. लोणावळ्यातील ‘टायगर पॉईंट’पासून अवघ्या काही अंतरावर मिनी कास पठार तयार झाले आहे.
तब्बल सात ते आठ वर्षांनंतर लोणावळ्यात कारवीच्या फुलांचा बहर आला आहे. संपूर्ण टेकडी कारवीच्या फुलांनी फुलून गेल्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी याठिकाणी दिसून येत आहे. धुक्याची चादर आणि कारवीच्या फुलांनी फुललेला परिसर अशी निसर्गाची पर्वणीच जणू पर्यटकांना मिळाली आहे. पर्यटकांचे आकर्षक असणारा लोणावळा परतीच्या पावसाने धुक्यात हरवला आहे. परतीचा पाऊस लोणावळ्यात अधूनमधून पडत असल्याने संपूर्ण लोणावळा आज धुक्यात हरवला होता. पर्यटक लोणावळ्यात वर्षाविहार करण्यासाठी पसंती देतात. मात्र परतीच्या पावसाने पुन्हा एकदा लोणावळ्यात आल्हाददायक वातावरण तयार झाले आहे. संपूर्ण लोणावळा धुक्यात हरवल्याने वाहनचालकांना मात्र वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. लोणावळ्यात आल्हाददायक वातावरण अनुभवयाला मिळत आहे.