24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयसीमेवरील तणाव निवळला, आता गस्त घालता येणार

सीमेवरील तणाव निवळला, आता गस्त घालता येणार

भारत-चीन सीमावाद, देप्सांग आणि देम्चोक भागातून सैन्य मागे प्रक्रिया पूर्ण, २०२० पासून सुरू होता वाद

लडाख : वृत्तसंस्था
भारत आणि चीन यांच्यात २०२० पासून सुरू असलेला सीमावाद आता संपुष्टात येणार आहे. दोन्ही देशांनी वादग्रस्त भागातून सैन्य माघारी घेण्याचे तसेच या भागातील अस्थायी चौक्या हटवण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार सैन्य मागे घेण्याची तसेच चौकी हटवण्याची प्रक्रिया आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देप्सांग पठार आणि देम्चोक या दोन ठिकाणी आता भारतीय सैनिकांना मे २०२० पूर्वीप्रमाणे गस्त घालता येणार आहे. भारत-चीनने यासंबंधीचा निर्णय घेतल्याने सीमेवरील तणाव निवळण्यास मदत झाली आहे.

दोन्ही देशांनी या भागातील सैन्यही मागे बोलावले आहे. तसेच या भागातील अस्थायी चौक्या हटवण्याची प्रक्रिया जवळपास संपुष्टात आली आहे. आता दोन्ही देशांचे अधिकारी या भागाची पाहणी करत आहेत. या पाहणीदरम्यान ड्रोन्सची मदतही घेतली जात आहे. या पाहणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारतीय सैनिकांना पूर्वीप्रमाणे गस्त घालता येणार आहे. मात्र, भारतीय सैनिकांना याची पूर्व कल्पना चीनच्या सैनिकांना देणे बंधकारक आहे. गस्त घालताना दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये कोणताही तणाव निर्माण होऊ नये, हा यामागचा उद्देश आहे.

महत्त्वाचे म्हणजे अशाच प्रकारची व्यवस्था आता अरुणाचल प्रदेश सीमेवरील वादग्रस्त भागांमध्ये लागू करण्याचा प्रयत्न असल्याचे लष्कराच्या सुत्रांनी सांगितले.खरे तर मे २०२० पासून भारत आणि चीन सैन्यात सीमेवर तणाव होता. जून २०२० मध्ये गलवान खो-यात झालेल्या झटापटीनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. या झटापटीत २० जवान शहीद झाले होते तर अनेक चिनी सैनिकही मारले गेले होते. गेल्या काही दशकांतील हा सर्वांत भीषण संघर्ष होता. या संघर्षानंतर भारत-चीनमधील संबंध अधिक ताणले होते. तसेच अनेकदा दोन्ही देशांत युद्धाचा भडका उडतो की काय, अशी स्थिती झाली होती. त्यातच भारताने कठोर पावले उचलत चिनी वस्तूंच्या आयातीवर प्रतिबंध घातले होते. त्यामुळे दोन्ही देशांतील संबंध बिघडले होते. परंतु चर्चेच्या अनेक फे-यानंतर किमान सीमेवरील वाद निवळण्यास मदत झाली आहे.

सैन्य मागे घेण्यासाठी वाढविला होता दबाव
जोपर्यंत चीनबरोबरचे संबंध सामान्य होत नाहीत, तोपर्यंत सीमेवर शांतता प्रस्थापित होणे अशक्य असल्याचे मत भारताने मांडले होते. त्यासाठी भारताने देपसांग आणि डेमचोक भागातून चिनी सैन्याला हटविण्यासाठी दबाव वाढविला होता. चर्चेच्या अनेक फे-या पार पडल्यानंतर काही दिवसांपूर्वी या भागातून सैन्य मागे घेण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली होती. आता या भागातून सैन्य मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे सीमेवरील तणाव निवळण्यास मदत झाली. आता यापुढे सीमा भागात सामान्य व्यवहार सुरू होतील आणि पुन्हा मागच्याप्रमाणे गस्त घालणे सोपे होईल, असे लष्करी सूत्रांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR