नवी दिल्ली : इंडिया आणि भारत या शब्दाबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, एनसीईआरटी या दोन शब्दामध्ये कोणताही फरक करत नाही. एनसीईआरटी राज्यघटनेत समाविष्ट असलेल्या आत्म्याचा स्वीकार करते आणि इंडिया आणि भारत या दोन्ही शब्दांना मान्यता देते. ही माहिती केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी राज्यसभेत सीपीआय (एम) खासदार इलामाराम करीम यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.
सीपीआय(एम) खासदाराने एनसीईआरटी पॅनेलच्या शिफारशीबाबत प्रश्न विचारला होता, ज्यानुसार एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये इंडिया हे नाव बदलून भारत असे केले जावे अशी शिफारस करण्यात आली होती. प्रत्युत्तरात अन्नपूर्णा देवी म्हणाल्या की, भारतीय राज्यघटनेच्या कलम १ मध्ये असे नमूद केले आहे की ‘इंडिया’, म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल. भारतीय राज्यघटनेने ‘इंडिया’ आणि ‘भारत’ या दोन्हींना देशाची अधिकृत नावे म्हणून मान्यता दिली आहे जी परस्पर बदलून वापरली जाऊ शकतात.
राज्यघटनेत असलेल्या भावनेचा स्वीकार
एनसीईआरटी आपल्या राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या या भावनेचा स्वीकार करते आणि त्या दोघांमध्ये फरक करत नाही. गेल्या ऑक्टोबरमध्ये एनसीईआरटीच्या एका पॅनलने सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये इंडिया हे नाव बदलून भारत करण्याचा प्रस्ताव दिला होता.