संभाजीनगर : विशेष प्रतिनिधी
मराठवाड्यात महायुती व महाविकास आघाडीमध्ये तुल्यबळ लढती होत आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन्ही पक्ष आमनेसामने येणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार मराठवाड्यात सर्वाधिक ११ ठिकाणी शिंदेसेना व उद्धवसेनेत लढत होत आहे. त्यानंतर पारंपरिक विरोधक भाजप आणि काँग्रेस १० ठिकाणी भिडत आहेत. शरद पवार यांचा पक्ष भाजपच्या विरोधात ७, शिंदेसेनेच्या विरोधात २ आणि अजित पवार यांच्या पक्षाविरोधात ८ ठिकाणी लढत आहे.
काँग्रेस आणि शिंदेसेनेत चार तर उद्धवसेना आणि अजित पवार यांच्या पक्षात फक्त दोन ठिकाणी लढत होईल. अजित पवार व काँग्रेस पक्ष परभणी जिल्ह्यातील पाथरी मतदारसंघात एकमेकांसमोर लढत आहेत.
भाजपकडे सर्वाधिक जागा : महायुतीमध्ये मराठवाड्यात सर्वाधिक २० मतदारसंघांत भाजप लढत आहे. त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत एक मैत्रीपूर्ण लढतीचा समावेश आहे. त्यानंतर शिंदेसेना १६ आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसने १० जागांवर उमेदवार उभे केले. त्यात आष्टी विधानसभेतील भाजपसोबत मैत्रीपूर्ण लढतीचा समावेश आहे. घटक पक्ष रासपला गंगाखेडची जागा महायुतीने सोडली आहे.
आघाडीत उद्धवसेना मोठा भाऊ : महाविकास आघाडीमध्ये मराठवाड्यात उद्धवसेनाच मोठा भाऊ ठरला आहे. मशाल चिन्हावर सर्वाधिक १७ उमेदवार उभे आहेत. त्यानंतर काँग्रेस १६ जागा लढवत असून, त्यातील एका जागेवर उद्धवसेनेसोबत मैत्रीपूर्ण लढत आहे. खा. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी चिन्हावर १५ उमेदवार उभे आहेत. महाविकास आघाडीने घटक पक्षास जागा सोडलेली नाही.
तीन जिल्ह्यात घड्याळ, दोन जिल्ह्यात पंजा, धनुष्यबाण हद्दपार
मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह नसणार आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि धाराशिव जिल्ह्याचा समावेश आहे. तर बीड आणि हिंगोली जिल्ह्यात पंजा चिन्ह असणार नाही. शिंदेसेनेचा धनुष्यबाणही बीड व लातूर जिल्ह्यात असणार नाही. भाजप, उद्धवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या पक्षांचे आठ जिल्ह्यात उमेदवार आहेत.