नवी दिल्ली : योगगुरु बाबा रामदेव हे वादात अडकत असताना दिसत आहेत. त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना कथीतरित्या ओबीसींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावरुन बाबा रामदेव माफी मांगो हा हॅशटॅग एक्सवर ट्रेंड होताना दिसत आहेत. तसेच काही नेटक-यांनी पतंजली उत्पादनावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे.
सोशल मीडियावर बाबा रामदेव यांचा एक व्हीडीओ व्हायरल होत आहे. आस्था चॅनेलवरील एका कार्यक्रमात ते बोलत होते. यात ते म्हणतात की, ‘ओबीसींची ऐसी तेसी, मी ब्राह्मण आहे आणि चारही वेदांचा अभ्यास केला आहे. मी अग्निहोत्री ब्राह्मण आहे आणि माझं गौत्र ब्रह्म गौत्र आहे’. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद देशभरात उमटताना दिसत आहे.
बाबा रामदेव यांना याबद्दल विचारण्यात आल्यानंतर त्यांनी ओबीसी असा उल्लेख केला नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, ‘मी ओबीसींबाबत काहीही म्हटलें नाही. मी ओवैसी म्हणालो. ओवैसी उलट्या डोक्याचे आहेत. त्यांच्या पूर्वजांनी देशद्रोही विचारधारा बाळगली होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लोकांनी बाबा रामदेव यांच्या विरोधात प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. बाबा रामदेव यांच्यावर टीकेचा भडीमार सुरु झाला आहे. एक्सवर पोस्टचा वर्षाव होत आहे. बाबा रामदेव माफी मांगो हे ट्रेंडमध्ये आले आहे. तसेच पतंजली उत्पादनावर बहिष्कार टाकण्याची मागणी होऊ लागली आहे. बाबा रामदेव यांच्या स्पष्टीकरणानंतर हा वाद शमतो का हे पाहावे लागेल.