मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेवर निशाणा साधला आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण विधान मंडळात एकमताने दिलेले आहे. सर्व विरोधी पक्षाचे नेत्यांनी सांगितले होते की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याचे काम करा त्या प्रमाणे ते झाले आहे. आता त्यानंतर जरांगे यांनी अशी आदळ आपट करण्याचे काय कारण आहे. आता त्यांचेच लोक त्यांच्या विरुद्ध आरोप करायला लागले आहेत. त्यामुळे कदाचित आता त्रस्त होऊन त्यांनी हे आकांड तांडव सुरु केले असेल.
जरांगेचे पितळ उघडे पडतेय
मनोज जरांगे पाटलांचे पितळ उघडे पडत आहे. त्यांनी केलेल्या गुप्त बैठका, फिरवलेले निर्णय, मराठा समाजाला त्यांनी जे काही गुमराह केलंय, त्यामुळे आता त्यांचेच लोक बोलायला लागलेले आहेत. कदाचित त्यांचे ब्लड प्रेशर वाढले असेल आणि त्यामुळे ते असे काही तरी बोलत आहेत, अशी टीका छगन भुजबळांनी केली आहे.
हे वैद्यकीय क्षेत्रातील मोठे आश्चर्य
तुम्ही अगोदर तब्येत सांभाळा. मला मोठे आश्चर्य वाटते की, उपोषण करत असतानाही त्यांचा आवाज फार खणखणीत आणि मोठा आहे. हे कसे काय आहे आणि ते १० लोकांना सुद्धा ऐकत नव्हते. एवढी शक्ती उपोषणकर्त्याला कशी आली, हे वैद्यकीय क्षेत्रातील मोठे आश्चर्य आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.