24.9 C
Latur
Thursday, March 13, 2025
Homeराष्ट्रीयसोनिया गांधींना विशेषाधिकार भंगाची नोटीस

सोनिया गांधींना विशेषाधिकार भंगाची नोटीस

सोनिया गांधींना राष्ट्रपतींना बिचारे म्हणणे भोवणार?

नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाष्य करताना काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी द्रौपदी मुर्मूंना ‘पुअर लेडी’ म्हटले होते. यावरून आता सोनियांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी सोमवार दि. ३ फेब्रुवारी रोजी काँग्रेसच्या राज्यसभा सदस्य सोनिया गांधी आणि खासदार पप्पू यादव यांच्याविरुद्ध संसदेच्या विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली आहे.

दोन्ही नेत्यांवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोनिया गांधींच्या या टिप्पणीवरून भाजपच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये राष्ट्रपतींच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारच्या टिप्पण्या राष्ट्रपतींच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवतात. या टिप्पण्या आदिवासींच्या प्रतिष्ठेशी देखील जोडल्या गेल्या आहेत आणि दोन्ही नेत्यांवर आदिवासी विरोधी मानसिकता असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सोनिया गांधी यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असल्याचे प्रियंका गांधी यांचे म्हणणे आहे. त्या ७८ वर्षांच्या महिला आहेत आणि त्या राष्ट्रपतींचा अपमान करणार नाहीत असे त्यांनी म्हटले आहे. बिचा-या राष्ट्रपती, त्या खूप थकलेल्या दिसत होत्या, अशी प्रतिक्रिया सोनिया गांधी यांनी दिली होती. यावर तेव्हाच राष्ट्रपती भवनाकडून प्रतिक्रिया आली होती.

सोनिया गांधी यांनी केलेले विधान दुर्दैवी आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात करण्यासाठी तासभर चाललेल्या भाषणादरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कुठेही थकल्या नव्हत्या, असं राष्ट्रपती भवनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांच्या टिप्पण्यांमुळे एका उच्चपदस्थांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. अशा टिप्पण्या दुर्दैवी असून पूर्णपणे टाळता येण्यासारख्या आहेत, असं राष्ट्रपती भवनाने म्हटले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR