मुंबई : प्रतिनिधी
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. राज्यात २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणुकांच्या घोषणेनंतर आता राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने राज्य सरकारला आचारसंहितेदरम्यान, मतदारांवर थेट परिणाम करणा-या आर्थिक योजना बंद करण्याच्या सूचना दिल्या असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निधी वाटपास तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत आतापर्यंत २.४ कोटींहून अधिक पात्र महिलांना पाच महिन्यांचे पैसे खात्यात आले आहेत. मात्र निवडणुकीच्या काळात महिलांना पुढील महिन्याची रक्कम मिळणार नाही. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर या योजनेसाठी आवश्यक असलेला निधी महिला आणि बालकल्याण विभागाने थांबवला आहे. यामुळे पात्र महिलांना योजनेचे पैसे निवडणुकीपर्यंत मिळू शकणार नाहीत. त्यामुळेच राज्य सरकारने या योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्र दिले आहेत. त्यामुळे महिलांना आता डिसेंबरचे पैसे मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.
सर्व प्रशासकीय विभागांना सूचना
मतदारांना आर्थिक लाभ देऊन थेट प्रभावित करणा-या योजना तातडीने बंद कराव्यात, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सर्व प्रशासकीय विभागांना जारी केल्या आहेत. याशिवाय आर्थिक लाभ देणा-या योजनांचाही आढावा घेण्यात आला. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सर्व विभागांना याबाबत विचारणा केली.
‘योजनादूत’ला स्थगिती
राज्य सरकारच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी दर महिन्याला १० हजार रुपयांच्या मानधनावर योजनादूतांची नियुक्ती करण्यास माहिती व प्रसारण विभागाने स्थगिती दिली आहे. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेत ‘योजनादूत’ तातडीने बंद करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला.
योजना सुरूच राहणार : उपमुख्यमंत्री पवार
जोपर्यंत मी इथे आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद करण्याचे विरोधकांचे स्वप्न कधीच यशस्वी होणार नसल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी एका व्हीडीओ संदेशाद्वारे महाराष्ट्रातील महिलांचे लाडकी बहीण योजनेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आणि माझ्या मनगटावर बांधलेल्या प्रत्येक राखीची मी शपथ घेतो की, ही योजना बंद होऊ देणार नाही, असेही अजित पवार म्हणाले.