22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रअब्दुल सत्तारांची हुकूमशाही मोडून काढा

अब्दुल सत्तारांची हुकूमशाही मोडून काढा

नागपूर : नागपूर विधिमंडळ अधिवेशन शेवटच्या टप्प्यात असताना चांगलेच तापले आहे. दाऊद इब्राहिम, इक्बाल मिर्ची, सलीम कुत्ता या कुख्यात दहशतवाद्यांशी राजकीय नेत्यांचे संबंध व त्यावरून आरोप-प्रत्यारोपही रंगले. अधिवेशन शेवटच्या टप्प्याकडे असताना आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी राज्याचे अल्पसंख्याक व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर अधिवेशनाच्या सुरुवातीलाच गंभीर आरोप केले होते. आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही सत्तार यांच्यात मतदारसंघातील हुकूमशाहीचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्यावर हल्ला चढवला.

खोट्या कादपत्रांच्या आधारे मेडिकल कॉलेज लाटण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप करत दानवे यांनी सभागृहात खळबळ उडवून दिली. अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे २०१८ पासून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नसतानाही कागदोपत्री हॉस्पिटल दाखवून मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा घाट घातला आहे. याविरोधात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिका-याने तक्रार केली तर त्याच्यावर हल्ला करण्यात आला.

विशेष म्हणजे युतीच्या काळात ही हुकूमशाही सुरू असून ती मोडून काढली पाहिजे, अशी मागणी दानवे यांनी सभागृहात केली. सिल्लोड नगर परिषदेत सत्तार यांची एकहाती सत्ता असल्यामुळे या जोरावर ते मनमानी करत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पक्ष कार्यालयासमोर संरक्षक भिंत बांधण्यासाठी सिल्लोड नगरपालिकेचा वापर केला गेला.

या हुकूमशाही प्रवृत्तीबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेले तर ती दाखल करून घेतली गेली नाही. विशेष म्हणजे भाजपच्या नेत्यांकडूनही त्यांना कसलीही सुरक्षा दिली जात नसल्याचे दानवे यांनी सांगितले. खासगी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी सुपरस्पेशालिटी रुग्णालय सुरू असणे आवश्यक आहे.

परंतु असे कुठेलही रुग्णालय नसताना ते केवळ कागदोपत्री दाखवून ३०० खाटांचे वैद्यकीय महाविद्यालय व ६० खाटांचे आयुर्वेदिक रुग्णालय सुरू करण्यासाठी परवानगी घेतली जात आहे. अब्दुल सत्तार हे सरकारमधील एक जबाबदार मंत्री असताना त्यांच्याकडूनच असा खोटारडेपणा होत असेल तर दाद कोणाकडे मागायची. काही महिन्यांपूर्वीच याच मंत्री महाशयांच्या मुलांची नावे शिक्षक पात्रता भरती घोटाळ्यातही आली होती, याची आठवणही दानवे यांनी यावेळी करून देत सत्तारांना घेरले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR