29.4 C
Latur
Sunday, January 26, 2025
Homeपरभणीशाश्वत उत्पादन देणा-या पिकांच्या वाणाची निर्मिती करावी : कृषि मंत्री मुंडे

शाश्वत उत्पादन देणा-या पिकांच्या वाणाची निर्मिती करावी : कृषि मंत्री मुंडे

परभणी : भारत देश अन्‍नधान्‍यात स्‍वयंपुर्ण नव्‍हे तर अन्‍नधान्‍य निर्यातदार देश म्‍हणुन ओळखला जातो. भारताची अर्थव्यवस्था ही शेती क्षेत्राशी निगडीत आहे. आज देश अन्‍नधान्य, दुध उत्‍पादन, फळे आणि भाजीपाल उत्‍पादनात जगात आघाडीवर आहे. जगातील सर्वात जास्त पशुधन आपल्‍या देशात आहे. आज हवामान बदलामुळे मोठया प्रमाणात शेतीवर परिणाम होत आहे. विद्यापीठ निर्मित हवामानास अनुकूल कृषि तंत्रज्ञान, विविध पिकांची वाण शेतकरी बांधवापर्यंत गेली पाहिजेत. तसेच विद्यापीठाने बदलत्‍या हवामानास अनुकूल उप‍युक्‍त तंत्रज्ञान विकसित करण्‍यावर भर द्यावा. पाऊसात अधिक दिवसाचा खंड पडला तरी शाश्‍वत उत्‍पादन देणा-या पिकांच्‍या वाणाची निर्मिती केली पाहिजे, असे प्रतिपादन कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी आणि परभणी आत्‍मा, कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने कृ‍षी तथा शेतकरी कल्‍याण मंत्रालय (भारत सरकार), नवी दिल्‍ली पुरस्‍कृत पश्चिम विभागीय कृषि मेळावा आणि कृषि प्रदर्शनीचे भव्‍य आयोजन दि.२१, २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्‍या क्रीडा संकुल प्रागंणात करण्‍यात आले आहे. या मेळाव्‍याचे कृषि मंत्री मुंडे यांनी ऑनलाईन माध्‍यमातुन उद्घाटन केले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू डॉ. इन्‍द्र मणि होते. विशेष अतिथी म्‍हणुन राज्‍य कृषी मुल्‍य आयोगाचे अध्‍यक्ष पाशा पटेल, खा. श्रीमती फौजिया खान, भारतीय कृषि संशोधन संस्‍थेचे संचालक तथा कुलगुरू डॉ ए के सिंग, आ. सुरेश वरपुडकर, जिल्‍हाधिकारी रघुनाथ गावडे, राष्‍ट्रीय कामधेनु आयोगाचे सदस्‍य सुनिल मानसिंगका, भारतीय किसान संघाचे राष्ट्रीय संघटन मंत्री दिनेश कुलकर्णी, सिने अभिनेता उपेंद्र लिमये, भारतीय किसान संघाचे प्रदेश संघटन मंत्री दादा लाड, डाळींब संशोधन केंद्राचे डॉ राजीव मराठे, राष्‍ट्रीय कांदा लसुन संशोधन केंद्राचे डॉ विजय महाजन आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना कृषिमंत्री मुंडे म्‍हणाले की, राज्‍यातील शेतक-यांसाठी फलदायी ठरलेली पोकरा योजनेची व्‍याप्‍ती वाढविण्‍यात आली. खरीप हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजने अधिक सोयीची करण्‍यात आली. सेंद्रीय शेती विषमुक्‍त शेती योजना प्रभावीपणे राब‍विण्‍यात येत आहे. शेतकरी कल्‍याण हेच शासनाचे ध्‍येय आहे असे सांगितले. यावेळी पाशा पटेल म्‍हणाले की, हवामान बदलाचा मानवी जीवनावर आणि शेतीवर मोठा परिणाम होत आहे. जागतिक तापमान वाढ होत आहे. पर्यावरण वाचवायचे असेल तर जंगलाची वाढ होणे आवश्यक आहे असे सांगितले.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. इन्‍द्र मणि म्‍हणाले की, कृषी संशोधकांनी शेतकरी हा केंद्रबिदु ठेवुण समर्पित भावनेने कार्य करावे असे आवाहन केले. प्रास्ताविक विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांनी केले. सुत्रसंचालन डॉ वनिता घाडगे देसाई, आभार डॉ. प्रशांत देशमुख यांनी मानले. सदर कृषि मेळाव्‍यात पश्चिम भारतातील महाराष्‍ट्रासह गुजरात, राजस्‍थान, मध्‍यप्रदेश, छत्‍तीसगड, गोवा, दीव-दमन आणि दादर नगर हवेली इत्‍यादी सहा राज्‍यातील शेतकरी बांधव, कृषी तज्ञ, कृषि संशोधकसहभागी झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR